बदलापुरात शवदाहिनीला विरोधाची झळ

बदलापुरात शवदाहिनीला विरोधाची झळ

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेला मोहनानंद नगर व बेलवली परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीत मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक इको क्रिमेशन म्हणजेच पर्यावरणपूरक शवदाहिनी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामावर सर्वसामान्य नागरिकांनी नापसंती दर्शवली असून, ही पद्धत बदलापुरात अयशस्‍वी ठरणार असल्याचे सांगत शवदाहिनींना विरोध करण्‍यात येत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्राच्या माध्यमातून स्वच्छ हवा या संकल्पनेंतर्गत बदलापूर पालिकेसाठी सात कोटी ७० लाखांचा निधी आणला आहे. त्या निधीच्या माध्यमातून बदलापूर पश्चिमेकडील मोहनानंद नगर व बेलवली परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशी विद्युत इको शवदाहिनीचा प्रयोग राबवण्यात येत आहे. तेथे असणाऱ्या स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करतेवेळी होत असलेले वायुप्रदूषण रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर हा प्रयोग करण्यात येत आहे.


शवदाहिनीसाठी मंजूर निधीतून तब्बल तीन कोटी रुपये खर्च होणार आहेत. या खर्चाला व या प्रयोगाला सामान्य नागरिकांनी मात्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प जरी मुंबईच्या धर्तीवर राबवण्यात येणार असला तरी यात अनेक त्रुटी व भोंगळ कारभार असल्याचे बोलले जात आहे. हा प्रयोग बदलापुरात अयशस्‍वी ठरणार असून, पालिका मात्र पैशांचा चुराडा करत असल्याचे येथील गावकरी व सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. बेलवली व मोहनानंद नगर येथील स्मशानभूमीत राबवत असलेल्या या दोन्ही प्रयोगाला विरोध दर्शवण्यात येत आहे.
------------------
आढळणाऱ्या त्रुटी
अत्याधुनिक शवदाहिनीचा प्रकल्प बदलापुरात राबवला जात आहे; मात्र येथील स्मशानभूमीत राबवताना मृतदेह शवदाहिनीमध्ये ठेवून अग्नी दिल्यानंतर आग सतत जळत राहण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. कार्बन डायऑक्साइड बाहेर खेचण्यासाठी असलेले पंखे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा प्रयोग बदलापुरात यशस्वी होणार नसल्याची चिन्‍हे आहेत.
-------------------
पालिका राबवत असलेला शवदाहिनीचा प्रयोग चांगला असला, तरी त्या अनुषंगाने बदलापूर पालिकेने त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कोणतीच उपाययोजना केली नसल्याने, हा प्रयोग अयशस्‍वी ठरणार आहे. यासाठी खर्च होणाऱ्या पैशांचा पालिका चुराडा करत आहे. त्या पैशांतून या ठिकाणी मोठमोठ्या चिमण्या बसवणे, स्वच्छता ठेवणे, डिझेल शवदाहिनी व लाकडावरील शवदाहिनी वाढवणे यासाठी भर देऊन पारंपरिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार झाले पाहिजेत, अशी भूमिका शहरवासीयांची आहे.
- ॲड. तुषार साटपे, ग्रामस्थ, बदलापूर
---------------------------------
स्वच्छ हवा हा उपक्रम मागील चार वर्षापूर्वी केंद्राकडून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत स्‍मशानभूमीत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पर्यावरणपूरक शवदाहिनीसाठी बदलापुरात एकूण तीन कोटींचा निधी वापरण्यात येत आहे. यात दोन इको क्रेमिशन वाहिन्या व डिझेलवरील शवदाहिनी सीएनजी गॅसवर करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध हा होतच असतो. उलट या शवदाहिनीत अंत्यसंस्कार करताना प्रत्येक शवाला साडे तीनशे किलो लाकूड लागते तिथे या पद्धतीत मात्र १२५ किलो लाकूड लागणार आहे. एक ते दीड महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, याचा बदलापूरकरांना फायदाच होणार असून याला त्यांनी विरोध करू नये.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगांव बदलापूर नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com