पालिकेची कोट्यवधींचे उड्डाण

पालिकेची कोट्यवधींचे उड्डाण

नवीन पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपासून महापालिकेने सिडको हस्तांतरित भाग, एमआयडीसी भागांमध्ये व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरू केली आहे. परिणामी, मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होत असून पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत २२० कोटी रुपये जमा झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे महापालिका महत्त्वाच्या सेवा नागरिकांना पुरवत असते. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते, त्यांची देखभाल, ड्रेनेज, परिसराची स्वच्छता, उद्याने, विविध नागरी सुविधा दिल्या जातात. मालमत्ता कर महापालिकेला सर्व सेवा देण्यासाठी महसूल मिळवून देत असतो. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत हा मालमत्ता कर असतो आणि कायद्यानेही तो भरणे बंधनकारक आहे. येत्या काळामध्ये महापालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध विकास कामांमध्ये नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, समाज मंदिरे, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत कोयनावळे, करवले, धानसर, रोडपाली, बौद्धवाडा येथील पायाभूत सुविधांची कामे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्ण होत आहेत.
प्रस्तावित कामांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी ४५० खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय ‘हिरकणी’ या नावाने प्रस्तावित केले आहे. नवीन मुख्यालय बांधणे, एलईडी पथदिवे बसवणे; तळोजे, पाचनंद येथील तलाव परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून यामुळे पनवेलच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असणार आहे.

मालमत्ता कर भरण्याचे आवाहन
मा. न्यायालयानेही मालमत्ता करवसुलीला स्थगिती दिली नसल्याने नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी पीएमसी टॅक्स मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www.panvelmc.org या संकेतस्थळावरही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनीही केले आहे.


कारवाई होणार
* १ एप्रिलपासून वाणिज्य, औद्योगिक; तसेच निवासी मालमत्तांवर जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे.
* मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता हस्तांतरणवर बंदी
* मालमत्ता कराचा बोजा चढवणार
* स्थावर व जंगम मालमत्ता अटकावून ठेवणार


मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्ता करवसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com