दुहेरी खूनातील आरोपीला जन्मठेप

दुहेरी खूनातील आरोपीला जन्मठेप

मनोर, ता. २६ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील निहे गावच्या फरले पाड्यात सहा वर्षांपूर्वी जुन्या वादातून लोखंडी पाईपच्या साह्याने मारहाण करून दोघांचा बळी घेतलेल्या आरोपीला पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मनोर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून पुरावे गोळा करून मूळ दोषारोप पत्र करून न्यायालयात सादर केले होते.
निहे गावच्या फरले पाड्याचा रहिवासी असलेला मयत सखाराम लक्ष्मण कांटेला (२७) हे ४ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी कामावर जात असताना आरोपी शरद देऊ कांटेला (३३) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी पाईपने डोक्यावर प्रहार केल्याने सखारामचा जागीच मृत्यू झाला होता. मारहाण सुरू असताना मयत सखारामची आई लक्ष्मी काटेला (५५) आणि पत्नी सुचिता सखाराम काटेला (२५) सखारामच्या मदतीला पुढे आल्या असता त्यांनाही आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. मयत सखाराम याची आई लक्ष्मी काटेला यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास मनोर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी महेश पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सुरू केला होता. आरोपीविरोधात कौशल्यपूर्ण पुरावा गोळा करून पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून एस. बी. सावंत, तपास अंमलदार पोलिस निरीक्षक महेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे आणि कोर्ट पैरवीकार म्हणून सहायक फौजदार भरत गावित यांनी काम पाहिले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या साक्षी आणि पोलिसांच्या तपासावरून आरोपीवरील विरोधात आरोप सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मकरंद देशपांडे यांनी आरोपीला कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप तसेच कलम ३०७ प्रमाणे जन्मठेप आणि नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com