एसटी बस हाफ तिकिटांनी फुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस हाफ तिकिटांनी फुल्ल
एसटी बस हाफ तिकिटांनी फुल्ल

एसटी बस हाफ तिकिटांनी फुल्ल

sakal_logo
By

जव्हार, ता. २६ (बातमीदार) : सुरक्षित प्रवासाकरिता एसटीला ग्रामीण भागातील नागरिकांकडून अधिक पसंती दिली जाते. त्यातच राज्य सरकारच्या विविध योजना एसटी प्रवासाकरिता सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना सवलतीत प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे हाफ तिकिटाने बस फुल होत आहे. त्यामुळे सरकराच्या निर्णयानुसार महिलांना व वयोवृद्धांना या योजनेचा लाभ होत आहे.
काही महिन्यांपूर्वीच प्रवशांच्या अभावी अनेक बस रिकाम्या धावत होत्या. परंतु सरकारने महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सेवा सुरू केली. त्यामुळे बसप्रवासाकडे लाभार्थीचा ओढा वाढला. प्रवाशांची संख्या वाढली असली तरी यात पूर्ण तिकीट घेवून प्रवास करणाऱ्यांना आता बसमध्ये जागा मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासन निर्णयाचा महिला वयोवृद्धांना लाभ झाला असला तरी पूर्ण तिकीट काढणारे पुरतेच हैराण झाले आहेत.
बस प्रवासात यापूर्वी ज्येष्ठांना हाफ तिकीट, शालेय मुलींना मोफत प्रवास, मुलांना प्रवासाचे पास आदी सवलती दिल्या जात होत्या. त्यात बस अवेळी येत असल्याने पूर्ण तिकिटाने प्रवास करणारे अनेक जण खासगी वाहनांचा आधार घेत होते. परंतु आता ७५ वर्षावरील नागरिकांना शासनाने बसप्रवास मोफत केला. अर्थसंकल्पात महिलांना अर्धे तिकीट योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या सवलतीचा फायदा घेत बसद्वारे प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांसह महिला वर्गाची संख्या चांगलीच वाढली आहे. सवलतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बस फुल होत आहे.
....
सरकारने ज्येष्ठांना बस प्रवास मोफत केला आहे. त्यामुळे दवाखान्यात तपासणीसाठी येताना माझा, माझ्या पत्नीचा प्रवासावर होणारा खर्च वाचला आहे. मुलांना भेटण्यासाठीही आता आमचा मोफत बस प्रवास होत आहे.
- देवराम पाटील, ज्येष्ठ नागरिक
...
सरकारने महिलांना बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात प्रवास करताना महिलांचा दवाखान्यासह इतर कामासाठी प्रवास करण्यात होणारा खर्च वाचला असून, अनेक गरजूंना याचा लाभ मिळत आहे.
- विशाखा अहिरे, माजी नगरसेविका, जव्हार
....

एसटी बस सवलतींचा महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळत आहे. बस प्रवाशांची संख्याही वाढली आहे; परंतु पूर्ण तिकीट काढणाऱ्या अनेकांना जागा मिळत नाही. यामुळे जव्हार आगाराने आता विविध मार्गावरील बसफेऱ्या वाढवाव्यात. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.
- वैभव अभ्यंकर, माजी नगरसेवक, जव्हार