सलमान खान धमकीप्रकरणी 
संशयिताला राजस्थानमधून अटक

सलमान खान धमकीप्रकरणी संशयिताला राजस्थानमधून अटक

मुंबई, ता. २६ : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी रविवारी (ता. २६) केलेल्या संयुक्त कारवाईत धाकडराम बिश्नोई याला राजस्थानच्या जोधपूर येथून अटक करण्यात आली.

वांद्रे पोलिस ठाण्यात १८ मार्च रोजी सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ई-मेलमध्ये दिल्लीच्या तुरुंगात असलेला गुंड बिश्नोई याचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात बिष्णोई गँगच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हा ई-मेल राजस्थानमधील जोधपूरमधून पाठवण्यात आल्याचे आढळून आले. त्याची माहिती जोधपूर पोलिसांना पाठवण्यात आली होती. पुढील तपासात हा ई-मेल जोधपूरमधील सियागो की धानी येथील रहिवासी धाकडराम बिश्नोई याने पाठवला होता, असे समोर आले. जोधपूर पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्याच्या पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत २१ वर्षीय धाकडरामला ताब्यात घेतले आणि संशयित आरोपीसह मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

सिद्धू मूसेवालप्रकरणीही चौकशी
पंजाबमधील मानसा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी धाकडराम याच्या शोधात पंजाब पोलिसांचे पथकही राजस्थानला आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्यासाठी एक ई-मेलदेखील पाठवला होता. या प्रकरणात आरोपी धाकडरामची चौकशी पंजाब पोलिसांकडून करण्यात आली होती. आरोपी धाकडराम याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com