
ग्रामीण भागात गॅस सिलिंडर शोभेलाच
जव्हार, ता. २७ (बातमीदार) : आदिवासीबहुल अशा जव्हार तालुक्यात केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला, पण सध्या गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे ग्रामीण भागात गॅस सिलिंडर केवळ शोभेलाच उरले असून केवळ ४० टक्के महिला लाभार्थी या गॅस सिलिंडरचा वापर करत आहेत, तर उर्वरित महिला चुलींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारने रॉकेल बंद करून सर्वांनी गॅसचा वापर करावा, यासाठी दारिद्र्यरेषेखालील महिलांना केवळ शंभर रुपयांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिले होते. यामुळे ग्रामीण भागातदेखील गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ग्रामीण भागात घरोघरी गॅस कनेक्शन झाले असले तरी दररोज गॅसचा क्वचितच वापर होताना दिसत आहे.
जून २०२२ पासून आठ महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १५३ रुपयांची वाढ झाली. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे त्याचा वापर करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. यामुळे ग्रामीणसह शहरी भागात शेतकरी व मजूर वर्गाने गॅसला फाटा दिल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या भावात दीडशे रुपयांपेक्षा जास्त भाववाढ झाली. यामुळे ग्रामीण भागातील गॅसधारकांकडून गॅसऐवजी पुन्हा चुलीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
......
गॅसचा ४० टक्के लाभार्थ्यांकडून वापर
जव्हार तालुक्यात बारा हजारच्या आसपास उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असून केवळ ४० टक्के लाभार्थी गॅस भरून घेत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
.....
गेल्या वर्षभरात सिलिंडरचे दर
महिना- दर
एप्रिल - ९७५
मे -९७५
जून -९७५
जुलै -१,०६९
ऑगस्ट - १,०६९
सप्टेंबर -१,०६९
ऑक्टोबर - १,०७८
नोव्हेंबर - १,०७८
डिसेंबर - १,०७८
जानेवारी (२०२३) -१,०७८
फेब्रुवारी (२०२३) - १,०७८
मार्च (२०२३) - ११२८
....
मागील काही महिन्यांत गॅस सिलिंडरचे दर वारंवार वाढत असल्याने ग्रामीण भागातील गॅसधारक गॅस सिलिंडर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. याला पर्याय म्हणून स्वयंपाक व इतर गोष्टींसाठी चुलीचा वापर केला जात असून प्रदूषण वाढून महिलांना धुराचा त्रास जाणवत आहे.
- कल्पना साठे, गृहिणी
....
तालुक्यात आधीच रोजगाराच्या संधींची समस्या, त्यात भरमसाठ गॅस सिलिंडर दरवाढ या सगळ्यांमुळे चुलीच्या धुराला स्वीकारले जात आहे.
- लता सातपुते, गृहिणी