बेकायदा झोपड्यांचे पेव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा झोपड्यांचे पेव
बेकायदा झोपड्यांचे पेव

बेकायदा झोपड्यांचे पेव

sakal_logo
By

वाशी, ता. २८ (बातमीदार) ः नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील ऐरोली नोडमधील यादवनगर तसेच गवतेवाडीतील मोकळ्या भूखंडावर भुमाफियांनी बेकायदा झोपड्यांचे अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे या झोपड्यांची गरंजवतांना बिनबोभाटपणे विक्री केली जात असून भविष्यात अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमआयडीसी भागातील गवतेवाडी, यादवनगर, चिंचपाडा परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक झोपडपट्टी दादांनी बेकायदा वसाहत निर्माण केली आहे. या अतिक्रमणांवर एमआयडीसीने अनेकदा कारवाईदेखील केली आहे. माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर एमआयडीसीच्या जागेवरील बेकायदा थाटलेल्या झोपड्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता. या वेळी झोपडपट्टी माफियांनी मुंढे यांच्याविरोधात मोर्चा काढला होता; तर अतिक्रमण पथकावर दगडफेक केली होती; मात्र मुंढे यांच्या कारवाईच्या धसक्यामुळे त्या ठिकाणी झोपडपट्टी दांदानी झोपड्या उभारण्याची हिंमत केली नव्हती, पण आयुक्तांच्या गच्छतीनंतर या ठिकाणी पुन्हा बेकायदा झोपड्या, दुकाने थाटली आहेत, पण मुंडे यांनी एमआयडीसीमध्ये केलेल्या कारवाईनंतर कोणत्याच आयुक्तांनी एमआयडीसीतील झोपड्यांकडे लक्ष दिलेले नाही.
--------------------------------
कारवाईत सातत्याचा अभाव
एमआयडीसी व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीचे भूखंड गिळंकृत केलेल्या जागेवर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केल्यानंतर भूखंडावर तारेचे तसेच पत्र्याचे कुंपणदेखील घालण्यात आले होते, पण झोपडपट्टीमाफियांनी कुंपणाचे पत्रे चोरून नेले आहेत; तर गवतेवाडी येथे कुंपण घातलेल्या जागतेच बस्तान मांडले आहे. कोरोनासारख्या महामारीनंतर एमआयडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपड्या वाढलेल्या आहे; तर एमआयडीसीची कारवाईदेखील थंडावली आहे.
--------------------------------
बेकायदा नळ जोडण्या
या झोपडपट्टी भागातील अनेक घरे झोपडपट्टी दादांनी दोन ते तीन लाखांना विकली आहेत. अशातच शासनाने सन २०१० पर्यंतची घरे अधिकृत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात आणखी मुदतवाढ मिळेल या आशेने शासनाचे भूखंड गिळंकृत करून झोपड्या बांधण्याचा सपाटा लावला जात आहे. विशेष म्हणजे या झोपड्यांना पालिकेच्या बेकायदा नळजोडण्या घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
-------------------------------
एमआयडीसीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे; तर एमआयडीसीने अनेक भूखंडांवरच्या झोपड्या हटवून भूखंड कंपन्यांना विकले आहेत. तसेच लवकरच पोलिस बंदोबस्तांत एमआयडीसीच्या भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल.
- एस. पी. शिंदे, उपअंभियता, एमआयडीसी