मालमत्ता कराबाबत ग्रामपंचायतींचा एल्गार

मालमत्ता कराबाबत ग्रामपंचायतींचा एल्गार

बोईसर, ता. २७ (बातमीदार) : सरकारने २०१९ मध्ये काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने एमआयडीसीतील उद्योगांकडून ग्रामपंचायतीकडून घेतला जाणारा मालमत्ता कर बंद करून तो एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच त्यातील ५० टक्के कर ग्रामपंचायतीस देण्याचा निर्णय झाला. कोविड काळात या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने एमआयडीसीलगत असलेल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये व ग्रामस्थांमध्ये याबाबत खूप मोठा असंतोष आहे. या निर्णयाने ग्रामपंचायतींचा महसूल घटला असून या माध्यमातून होणारी विकासकामे ठप्प झाली आहेत.
बोईसर परिसरातील ग्रामपंचायतींनी ५० वर्षांपूर्वी एमआयडीसी स्थापन करतेवेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. आता मालमत्ता करही जमा होत नसल्याने येथील गावांचा विकास रखडला आहे. एमआयडीसीच्या या निर्णयाविरोधात ग्रामपंचायती एकवटत आहेत. या निर्ययाविरोधात कुंभवली, कोलवडे व पाम ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह एमआयडीसीचे तारापूर विभागाचे उपअभियंता लांजेवार व अनासने यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. यावेळी एमआयडीसीने कुठल्याही स्वरूपात कर स्वतःकडे न घेता तो पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीकडेच देण्याची मागणी करण्यात आली. तसेच आजतागायत गेल्या तीन वर्षांत घेतलेला टॅक्स ग्रामपंचायतीस वर्ग करावा, तसेच उर्वरित रकमेपैकीही थकबाकीच्या नावाखाली परस्पर घेतलेला कर त्वरित ग्रामपंचायतीस द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
एमआयडीसीविरोधात झालेल्या या आंदोलनात कुंभवलीच्या सरपंच तृप्ती संखे, पामच्या सरपंच दर्शना पिंपळे, कोलवडेचे सरपंच कुंजल संखे, तसेच उपसरपंच हेमांगी संखे, अमित संखे, मनोज पिंपळे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते. विशेष म्हणजे या लढ्याला पाठबळ देण्याकरिता जिह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनीही उपस्थिती देऊन ग्रामस्थांची बाजू मांडली. यावेळेस पर्यावरण दक्षता मंचचे मनीष संखे ही उपस्थित होते.
....
गावातील जलस्रोतही प्रदूषित
सरपंचांनी गावातील नैसर्गिक नाल्यांत येथील कारखान्यांमधून रोजच्या रोज लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येते. त्यावरही कोणतीही कारवाई केली जात नाही. या प्रदूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना शेती करता येत नाही. तसेच गावातील जलस्रोतही प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे एमआयडीसीने बाधित गावांना मोफत पाणी देणे हे कर्तव्यच आहे. तसेच पुढील काही दिवसांत प्रदूषित झालेल्या गावांतील एमआयडीसीलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यांवर ग्रामपंचायतीकडून बांध टाकण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com