रुग्णांचा जीव टांगणीला

रुग्णांचा जीव टांगणीला

वसई, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात आरोग्य केंद्रात डॉक्टरांऐवजी मद्यपी शिपाईच आरोग्य तपासणी करून उपचार देत असल्याची गंभीर घटना तलासरी तालुक्यातील उधवा येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्याचे समोर आले आहे. एका १३ वर्षीय चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र नातेवाईकांनी त्याला रोखले. या घटनेमुळे ग्रामीण भागात आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागात नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून विविध योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रांत वाढ करत डॉक्टरांची नियुक्ती केली गेली. मात्र डॉक्टरांऐवजी शिपाईच रुग्णांना तपासत असल्याचे उधवा येथील घटनेमुळे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची तपासणी करणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू राहील व हकनाक जीवही जाऊ शकतो, असे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात आले.
डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोल यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ उधवा आरोग्य केंद्राला भेट देत घटनेची माहिती घेतली. एक-दीड वर्षापूर्वी संबंधित शिपाई आरोग्य सेवेत दाखल झाला. यापूर्वीही त्याने एक-दोन वेळा असा प्रकार केला होता. त्यावेळी त्याला नोटीस बजावण्यात आली होती. पण आता पुन्हा त्याने चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला, त्याला रोखण्यात आले. मात्र हा प्रकार गंभीर आहे. तसेच या शिपायाला जिल्हा आरोग्य प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले आहे, अशी माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली.
एकीकडे गरीब-गरजू, आर्थिक दुर्बल घटकाला आरोग्य सेवा मिळावी म्हणून प्रशासन व शासनाकडून प्रयत्न केले जात असताना शिपाईच डॉक्टर बनू लागला तर पालघर ग्रामीण भागात नागरिकांचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे असेच दिसत आहे.
-------------------
उधवा येथील आरोग्य केंद्रात घडलेली बाब गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिक विश्वासाने सरकारी दवाखान्यात जातात. मात्र अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होईल.
- श्रीनिवास वनगा, आमदार, पालघर
---------------------
आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. आरोग्य यंत्रणेत बजबजपुरी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने अशा बाबी रोखण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही.
- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड
-----
तलासरी येथील उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच डॉक्टरांशी चर्चाही केली. घटना घडल्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडते, मात्र अशा घटनांना आवर घालण्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कळवले आहे.
- विनोद निकोले, आमदार, डहाणू
--------
तलासरी उधवा येथे घडलेल्या घटनेनंतर कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. असे प्रकार घडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आरोग्य केंद्राची तपासणी केली जाईल.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग
-------------------
वसई : उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार विनोद निकोले यांनी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com