वीज दरवाढीविरोधात आपचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज दरवाढीविरोधात आपचे आंदोलन
वीज दरवाढीविरोधात आपचे आंदोलन

वीज दरवाढीविरोधात आपचे आंदोलन

sakal_logo
By

तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : महावितरणकडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दरवाढ करण्यात आली होती. संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही वीज कंपन्यांकडून पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात सोमवारी (ता. २७) नवी मुंबई आम आदमी पक्षाने वाशी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात राज्यभर आपतर्फे आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की, आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३० टक्के स्वस्त वीज देवू. भाजपकडून विविध राज्यांतील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर आंदोलने केली. दुसरीकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करत आहे. नव्याने सरकारमध्ये आलेले पंजाबमधील भगवंत मान सरकारनेही १ जुलैपासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. जे इतर राज्यांत जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?, असा सवाल या वेळी आप नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी केला.

''युती सरकारने आश्‍वासनाची पूर्तता करावी''
राज्यात २.५० ते ३ रुपयांत प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिटप्रमाणे दर लावून जनतेची लूट होत आहे. ही लूट थांबवण्यासाठी आप राज्यात तीन वर्षांपासून सातत्याने आंदोलन करत आहे. आता भाजप-शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. राज्यात १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० टक्के अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी ३० टक्के स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करावी, अशी खोचक टीका आपच्या नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर यांनी केली.