मानसिक आजारांवर पालिकेचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिक आजारांवर पालिकेचे लक्ष
मानसिक आजारांवर पालिकेचे लक्ष

मानसिक आजारांवर पालिकेचे लक्ष

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : कोविडनंतर प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम झाला. मानसिक आरोग्याने प्रत्येक व्यक्ती हैराण आहे. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून राज्य सरकारच्या उपाययोजनांनंतर ‘आपला दवाखाना’ आणि इतर रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याविषयीचे उपचार, समुपदेशन आणि सल्लामसलत केली जाणार आहे. राज्य सरकारच्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतही टेलिमानस आणि मनशक्ती क्लिनिकची संकल्पना सुरू होणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या मानसिक आजारांवर योग्य ते उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध व्हावेत म्हणून मनशक्ती क्लिनिकची स्थापना करण्यात आली होती; पण मुंबईत अशा प्रकारची सोय नसल्याने पालिकेने आपली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये अशी सुविधा सुरू करण्याचा निर्णय येत्या १ एप्रिलपासून घेतला आहे.

राज्य सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनचे वेगवेगळ्या भाषांमधील पोस्टर आणि बॅनर दवाखाना व आरोग्य केंद्रामध्ये लावले जातील. सध्या नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक गोष्टीचा पर्याय आत्महत्या असल्याचे नैराश्यग्रस्त व्यक्तींना वाटते. वाढत्या आत्महत्यांच्या घटनांना रोखण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. संपूर्ण मार्च महिना डॉक्टरांचे प्रशिक्षण झाले आहे. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांतील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले गेले आहे.

३५० हून अधिक डॉक्टरांचे प्रशिक्षण
- ३५० हून अधिक डॉक्टरांना मानसिक आरोग्यासंबंधित प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या बॅचमध्ये २७१ डॉक्टरांना प्रशिक्षण दिले गेले. ३० मार्चपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी आहे.
- पालिका दवाखाने, आरोग्य केंद्रे, एचबीटी क्लिनिक आणि पॉलिक्लिनिकमधील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात आहे. संबंधित डॉक्टर चिंता, नैराश्य, तणाव आणि ताणाचे रुग्ण शोधतील. त्यांचे निदान केले जाईल.
- उपचारांची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी दोन मानसोपचार तज्ज्ज्ञांचीही नियुक्ती केली गेली आहे.

पालिकेच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, की टेलिमानस कार्यक्रमाअंतर्गत मनुष्यबळ वाढवण्याचे काम सुरू आहे. सध्या डॉक्टरांचे प्रशिक्षण झाले आहे. इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन बाकी आहे. एप्रिलपासून मनशक्ती क्लिनिक्स सुरू होतील. कार्यक्रमाअंतर्गत मानसिक रुग्णांचीही नोंद केली जाणार आहे. पालिकेच्या निधीतून समुपदेशकांची नियुक्ती केली जाईल. आठवड्याभरात तीन ते चार आत्महत्यांची प्रकरणे कानावर येत आहेत. त्यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.

संपर्कासाठी टेलिमानस क्रमांक
राज्य सरकारने टेलिमानस टोल फ्री क्रमांक (१४४१६) प्रत्येकासाठी खुला केला आहे. कोणत्याही मानसिक आजारासंबंधित प्रश्न आणि समस्या त्यावर संपर्क करून विचारता येतील. आतापर्यंत जवळपास तीन ते साडेतीन हजारांहून अधिक कॉल त्यावर आले आहेत.