
दक्षिण मुंबईतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
मालाड, ता. २७ (बातमीदार) ः भाजप मुंबई महिला मोर्चातर्फे विविध क्षेत्रांतील स्त्री-शक्तीचा मंत्री मंगलप्रभात लोढा व मंजू लोढा यांच्या हस्ते ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली साठे, शुभांगी मयेकर, जान्हवी गुर्जर, मनीषा पटवर्धन, पद्मा चड्डा, रूपा नाईक, श्वेता शेरवेगर, ईशाली आंब्रे, गीता सोनवणे, लीला गोडबोले, सरिता सातपुते, जान्हवी भगत, सीमा महाजन आदी महिलांचा समावेश होता. या महिलांना ‘सुषमा स्वराज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रामदास आठवले यांचे कार्य संगीतबद्ध
मुंबई ः केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे कार्य संगीतबद्ध केले गेले आहे. त्यांच्या कर्तृत्वावर आणि सामाजिक कार्यावर आधारित ‘आमचे रामदास आठवले’ या व्हिडीओ गीताचे प्रकाशन मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गोराई येथे करण्यात आले. या गीताची निर्मिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे महाराष्ट्र कोषाध्यक्ष आणि आरपीआय आगरी-कोळी आघाडीचे अध्यक्ष ऋषी माळी यांनी केली आहे. तसेच या गीताचे गीतकार, संगीतकार व गायक जयवंत भंडारी आणि सह गायिका नीलिमा माळी आहेत. तसेच ओम व विपुल यांनी गीताचे संगीत दिग्दर्शन केले आहे. गीत प्रकाशनाच्या कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्यासोबत ऋषी माळी, जयवंत भंडारी, नीलिमा माळी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे महासचिव गौतम सोनवणे, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश गायकवाड, माजी नगरसेविका अंजली खेडेकर तसेच उत्तर मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिक्षाचालक दत्तात्रय सावंत यांना पुरस्कार
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः कोरोना काळात ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा विचार न करता कर्तव्याच्या पलीकडे जाऊन आपली जबाबदारी बजावली अशांचा आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थांच्या वतीने ‘स्पिरीट ऑफ मुंबई’ या पुरस्काराने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक अनुज नरूला हे उपस्थित होते. घाटकोपर या ठिकाणी वास्तव्यास असलेले व पेशाने शिक्षक व पार्टटाईम रिक्षाचालक असलेले दत्तात्रय सावंत यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
अनंत कांबळे यांचे निधन
मालाड, ता. २७ (बातमीदार) ः आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अनंत कांबळे उर्फ बापू कांबळे यांचे रविवारी (ता. २६) संध्याकाळी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. सोमवारी (ता. २७) त्यांच्यावर मालवणीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.