घाटकोपरमधील वृत्तपत्र विक्रेत्यांवर यापुढे कारवाई नाही

घाटकोपरमधील वृत्तपत्र विक्रेत्यांवर यापुढे कारवाई नाही

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः गेला आठवडाभर घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेकडील वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई होत होती. या पार्श्वभूमीवर कोणत्याही वृत्तपत्र विक्रेत्यावर कारवाई करू नये, असे साकडे पालिकेच्या एन विभागाच्या सहायक आयुक्त संजय सोनवणे यांना घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ तसेच ईशान्य मुंबई शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने संयुक्तपणे घालण्यात आले. त्यावर आयुक्तांनी यापुढे एकाही वृत्तपत्र विक्रेत्यावर कारवाई होणार नाही अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली आहे.
सोमवारी (ता. २७) घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ तसेच ईशान्य मुंबई शिवसेना ठाकरे गट या दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने सहायक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांची भेट घेतली. या वेळी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष प्रकाश वाणी, वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष राजेंद्र खरात तसेच पदाधिकारी दीपक गवळी, किशोर येवले, विपुल गायकवाड, नीलिमा कोठवदे, सचिन भांगे, भूषण वाणी उपस्थित होते. त्यांनी सोनवणे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. ऊन, वारा, पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता सामाजिक बांधिलकी जपत वृत्तपत्र विक्रेता लोकांच्या घरी पेपर पोहोचवत असतो. तसेच काही वेळ रेल्वे स्थानक परिसर यासह रस्त्याच्या कडेला बसून चारपाच रुपयांचे पेपर विकत असतात. या वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता सेना तसेच घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीने रेल्वे आणि शहर पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा बल, महानगरपालिका यांच्याकडे पूर्वीही पाठपुरावा करण्यात आला होता.

यापूर्वीच्‍या कारवाया
घाटकोपर पश्चिमेला झुनझुनवाला कॉलेजसमोरील वृत्तपत्र विक्रेता किशोर येवले यांना घाटकोपर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष प्रकाश वाणी, उपाध्यक्ष सचिन भांगे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्या वेळीही आरपीएफचे पोलिस निरीक्षक अतुल टोके यांची भेट घेऊन सदर वृत्तपत्र विक्रेत्यावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. त्या वेळी सरसकट सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये अशी मागणी केली होती. आज पुन्हा पालिकेचे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांना पत्र देऊन सहायक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या वेळी त्यांनी यापुढे ही कारवाई बंद होईल, असे आश्वासन दिल्याची माहिती प्रकाश वाणी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com