सुट्टीच्या हंगामात विद्यार्थ्यांचा हिरमोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीच्या हंगामात विद्यार्थ्यांचा हिरमोड
सुट्टीच्या हंगामात विद्यार्थ्यांचा हिरमोड

सुट्टीच्या हंगामात विद्यार्थ्यांचा हिरमोड

sakal_logo
By

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शिरवणे येथील शाळेच्या मैदानात होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने सुट्टीच्या हंगामात हक्काच्या मैदानावर खेळता येत नसल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शिरवणे येथील अरुण सुतार शाळा क्रमांक १०१ च्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना हक्काच्या मैदानावर खेळता येत नाही. वाहनांमधून वाट काढत शाळेत ये-जा करावी लागत आहे. या प्रकारावरून काही वर्षांपूर्वी माजी महापौर जयवंत सुतार यांनी पालिका अधिकाऱ्यांनादेखील खडसावले होते. तसेच नागरिकांच्या वाहनांना पार्किंगची सुविधा देण्याचे आदेशही दिले होते; मात्र आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने वाहनांचे पार्किंग शाळेच्या मैदानातच होत असल्याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मैदानाचा वापर करता येत नाही.
----------------------------------------
पार्किंगबाबतचे नियोजन कागदावरच
शिरवणेतील पार्किंगचा विषय गंभीर झाला आहे. गावात ये-जा करण्यासाठी मोठा रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना शाळेच्या मैदानातूनच ये-जा करावी लागते. तसेच रिक्षाचालक, खासगी वाहनचालक, स्कूल बसचालकांना पार्किंगसाठी जागा नसल्याने शाळेच्या मैदानावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे.
-------------------------------
शिरवणे येथील शाळेच्या मैदानातील पार्किंगचा विषय लवकरच सोडवण्यात येईल. तसेच या ठिकाणाची पाहणी करून शाळेच्या मैदानात वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- मनोहर गांगुर्डे, विभाग अधिकारी, नेरूळ