भिवंडीत पाणी योजना होणार कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत पाणी योजना होणार कार्यान्वित
भिवंडीत पाणी योजना होणार कार्यान्वित

भिवंडीत पाणी योजना होणार कार्यान्वित

sakal_logo
By

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ रखडलेल्या १०० एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिल्याने भिवंडी शहरातील नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहेत.
भिवंडी शहराच्या विकासासह शहराची लोकसंख्या वाढत असताना गेल्या दहा वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना भिवंडी महापालिका करीत होती. परिणामी, नागरिकांना वेळेनुसार पाणी मिळत नव्हते. त्यामुळे महापालिकेतील तत्कालीन लोकप्रतिनिधी सरकारकडे पाणीयोजनेसाठी निधी मिळावा यासाठी मागणी करून पाठपुरावा करीत होते. मात्र, आश्वासनाशिवाय काही हाती लागले नाही. या पाणीयोजनेच्या निमित्ताने भिवंडी महापालिकेने शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा नियमित व सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्यादेखील बांधल्या आहेत. मात्र, टाकी भरण्यासाठी पालिकेकडे पाणी उपलब्ध नव्हते. ही गरज भागविण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या १०० एमएलडी पाणी योजनेला केंद्र सरकारने अमृत २.० योजनेत समावेश केला. या योजनेंतर्गत भिवंडी महापालिकेसाठी ४२६ कोटी रुपयांच्या १०० एमएलडी पाणीपुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या भिवंडी महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाने देखील सरकारकडून निधीसाठी प्रयत्न झाले. सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने भिवंडी महापालिकेने नुकतीच या प्रकल्पासाठी ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणीपुरवठा प्रकल्पाचा मार्ग मोकळा करून दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भिवंडी भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी आभार मानले आहेत.