
अंगणवाडी सेविका याच खऱ्या समाजाच्या सेवेकरी
पालघर, ता. २८ (बातमीदार) : सर्व गोष्टींची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून राज्याचा आणि जिल्ह्याचा खरा विकास अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. महिला व बालविकास विभागातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका प्रामाणिकपणे काम करत असून समाजाची खऱ्या अर्थाने सेवा करणारा तुमचा वर्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली आहे.
जिल्हा परिषद पालघर, महिला व बाल विकास विभागातर्फे आयोजित आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, सभापती महिला व बालकल्याण समिती रोहिणी शेलार, तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी पुरस्कार घेतलेल्या महिलांकडून प्रेरणा घेऊन इतर महिलांनी संधीचा फायदा घेऊन पुढच्या वेळी पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहेच, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोठा वाटा असतो, असे मत व्यक्त केले.
सभापती रोहिणी शेलार यांनी अंगणवाडीपासूनच मुलांचा पाया मजबूत करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची असून सर्व आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, असे सांगून पुरस्कारप्राप्त महिलांना शुभेच्छा दिल्या.
सोहळ्यात ९१ महिलांचा गौरव
पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये एकूण ९१ अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रकल्पनिहाय प्रत्येकी एका मुख्य सेविकेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एका प्रकल्पातील प्रथम, द्वितीत व तृतीय अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुरस्कार देण्यात आले. प्रथम पुरस्कारास ५००० रु, द्वितीय ३००० तृतीय पुरस्कारास प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बक्षिसाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
...
पालघर : अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांचा गौरव करण्यात आला.