
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे पोलिसांसमोर आव्हान ः मिलिंद भारंबे
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : इंटरनेट, स्मार्टफोनच्या युगात उच्चशिक्षित व्यक्तीदेखील सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. काही तरी मोफत मिळवण्याच्या प्रलोभनातून बहुतांश वेळा फसवणूक होते. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे. वाशी गावातील नवी मुंबई पोलिस दलासाठीच्या पाचदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, अशा गुह्यात लुटला गेलेला पैसा सहसा परत मिळत नाही. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची कौशल्यपूर्ण उकल करून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनाही प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच अल्पवयीन मुलांसह तरुणांकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा होणारा चुकीचा वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांमधील त्यांचा वाढता सहभाग चिंतेची बाब आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ः------------------------------------
या कार्यशाळेत पोलिसांना डिजिटल फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मुख्यालयाबरोबरच प्रत्येक पोलिस ठाण्यात यंत्रणा उभी केली जाणार आहे.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई