ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रवेश

ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत असताना आता कोरोनाच्‍या नवा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने मार्च महिन्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी ३२ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यापैकी नऊ रुग्णांना ‘एक्सबीबी.१.१६’ या नव्‍या व्हेरिएंटची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; तर ‌उर्वरित सात रुग्ण हे गृहविलगीकरणात घरीच उपचार घेत असून, सर्व रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित २३ रुग्णांच्या चाचणीचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाल्या आहेत.

एकीकडे कोरोना आटोक्यात आल्‍याची चर्चा होती, पण तो पूर्णपणे आटोक्यात आलाच नसल्‍याचे दिसून येत आहे. शहरात दिवसाला एकदोन रुग्ण रोज आढळून येत होते. ती संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्यातच गेल्या काही दिवसांत ही संख्‍या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात आतापर्यंत ४४७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत २४६ रुग्ण हे सक्रिय असून त्यातील २२१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत; तर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १४; तर खासगी रुग्णालयात ११ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे दररोज ५० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ या आजाराचेही रुग्ण शहरात आढळून येत असून या आजाराचे २४ रुग्ण मार्च महिन्यात आढळून आले आहेत. दुसरीकडे शहरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘एक्सबीबी.१.१६’ने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या व्हेरिएंटचे नऊ रुग्ण आढळून आल्याची माहिती नमुने तपासणी अहवालातून पुढे आली आहे.
------------------------------------
गृहविलगीकरणावर भर
वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठक घेत अँटिजन चाचण्या वाढण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. सध्या दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या केल्या जात आहेत; मात्र ही चाचणी करून घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नाही. मागील अनुभवामुळे ते चाचणी करून घेण्यासाठी प्रामुख्याने टाळत असल्याचे दिसत आहे. सापडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असली, तरी त्यांची लक्षणेही सौम्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना होम क्वॉरंटाईन ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
...........................................
स्वाईन फ्‍ल्यूच्या २१९ रुग्णांची नोंद
ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘एक्सबीबी.१.१६’चा शिरकाव झाला आहे. स्वाईन फ्‍ल्यू या आजारानेदेखील डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत २१९ स्वाईन फ्‍ल्यूचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ५७ रुग्ण हे मार्च महिन्यात आढळून आलेले आहेत. या तिन्ही आजारांच्या वाढत्या संसर्गामुळे शहराची आरोग्याची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com