मुंबईच्या तिजोरीवर दरोडा

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा

मुंबई, ता. २८ ः कॅगने केलेल्या चौकशीत मुंबई महापालिकेचा ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. यामागचा सूत्रधार कोण, हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळ्यावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते त्याचे वर्णन करायचे तर कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल. त्यांनी मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला, असा थेट आरोप शेलार यांनी केला आहे.

कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८,४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, याप्रकरणी फौजदारी दंड संहितेअंतर्गत एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड. शेलार यांनी केली आहे. कंपन्यांना टेंडरविना काम देण्यात आले. टेंडरपेक्षा जास्त कामे दिली आहेत. टेंडर पडताळणीविना, अपात्र असलेल्यांना कामे दिली आहेत. काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर ‍दिले; पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी-शर्तीचा भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.

शेलार म्हणाले की, सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. मातोश्रीजवळची कामे, परेल टीटी उड्डाण पूल, मिठी नदी अशी अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळ्यांची एसआयटी चौकशी व्हावी. याचा सूत्रधार कोण, हे उघड व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com