मिरा-भाईंदरमधील धुळ येणार नियंत्रणात

मिरा-भाईंदरमधील धुळ येणार नियंत्रणात

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने धुळ नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत दोन अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यात आली असून वाहनांवर बसविण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे शहरातील झाडे, रस्ते, रस्ते दुभाजक पाण्याने धुवून काढण्यात येणार आहेत. या वाहनाचे प्रात्यक्षिक आज आयुक्त दिलीप ढोले व अन्य अधिकाऱ्‍यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आले. या यंत्रणेमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोगातील निधीमधून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत दोन धुळ नियंत्रक वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्याची किंमत प्रत्येकी एक कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. या वाहनांवर सात ठिकाणी पाण्याचे जेट बसविण्यात आले आहेत. जे विशिष्ट दाबाने पाण्याचे फवारे सोडणार आहे. या यंत्रणेद्वारे शहरात धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी सातत्याने पाण्याचा फवारा करून हवेतील धूलिकण कमी केले जाणार आहेत. त्याचबरोबर रस्त्यालगत असलेली उंच झाडे धुणे, रस्ते धुवून काढणे, दुभाजके धुवून काढणे, दुभाजकांवरील झाडांना पाणी देणे, त्यावर जमा झालेले धूलिकण, फुटपाथवरील झाडांवर जमा झालेले धूलिकण कमी करणे आदी कामेदेखील केली जाणार आहेत. त्याचबरोबर या यंत्रणेचा वापर आपत्ती व्यवस्थापनासाठीही करण्यात येणार आहे, अत्यावश्यक परिस्थितीत आग विझवण्याकरिता त्याचा वापर केला जाणार आहे. वाहनावर आठ हजार लीटर क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून ही यंत्रणा वाहन चालकालाच हाताळता येणार आहे. त्यामुळे जास्त मनुष्यबळाचीही आवश्यकता लागणार नाही. हाय टेक या कंपनीने ही वाहने तयार केली आहेत.

हवेत धुलीकणांचे प्रमाण जास्त
मिरा-भाईंदर शहर हे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे तसेच रस्त्यांवर धावणाऱ्‍या वाहनांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे शहरातील हवेत धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातही हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त दिलीप ढोले यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हवेतील धुळ नियंत्रणावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर ही धुळ नियंत्रण वाहने उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील एकंदर सहा प्रभागांपैकी तीन प्रभागांसाठी एक या पद्धतीने दोन वाहनांची विभागणी केली जाणार आहे.
....
अन्य महापालिकांकडून प्रात्यक्षिकाची मागणी
हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या विषयावर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सर्व महापालिकांच्या बैठकीत मिरा-भाईंदर महापालिकेने या यंत्रणेचा डेमो सादर केला होता. हा डेमो पाहून पुणे व मुंबई महापालिकेने या वाहनाचे प्रात्यक्षिक त्यांच्याकडे करण्याची महापालिकेला गळ घातली. त्यामुळे हे वाहन मंगळवारी महापालिकेत दाखल होण्याआधी सोमवारी त्याचे पुणे महापालिकेत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आता मंत्री दीपक केसरकर यांच्या आग्रहानुसार मुंबई महापालिकेतही त्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com