कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.१५ टक्के

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.१५ टक्के

नवी दिल्ली, ता. २८ ः सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील (प्रॉव्हिडंड फंड-पीएफ) ठेवींवरील व्याजदर ८.१५ टक्के केला आहे. देशातील पाच कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) मंगळवारी यासंदर्भातील कार्यालयीन आदेश जारी केला. मार्च २०२२ मध्ये ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी व्याजदर ८.१० टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो सुमारे ४० वर्षांतील सर्वांत कमी दर होता. १९७७-७८ मध्ये हा व्याजदर सर्वांत कमी म्हणजे आठ टक्के होता.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याजदर निश्चित केला जातो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) निर्णय घेणारे सर्वोच्च केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी) व्याजदर ठरवते. त्यांनी व्याजदर ठरवल्यानंतर वित्त मंत्रालयाला ते कळवले जातात. मंत्रिमंडळाने संमती दिल्यानंतर हे दर जाहीर केले जातात. ईपीएफओ कायद्यानुसार कर्मचाऱ्‍याच्या मूळ पगाराच्या १२ टक्के आणि महागाई भत्ता या खात्यात जातो; तर त्याच वेळी, कंपनी कर्मचाऱ्‍यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के आणि महागाई भत्ता यांचे योगदान देते. कंपनीच्या १२ टक्के योगदानापैकी ३.६७ टक्के योगदान खात्यात जाते; तर उर्वरित ८.३३ टक्के पेन्शन योजनेत जाते. कर्मचाऱ्याच्या योगदानाचे सर्व पैसे खात्यात जमा केले जातात.

--
आता किती मिळेल व्याज
समजा, ३१ मार्च २०२३ पर्यंत तुमच्या पीएफ खात्यात पाच लाख रुपये जमा आहेत. त्यावर आता तुम्हाला ८.१५ टक्के दराने ४०,७५० रुपये व्याज मिळेल. ८.१० टक्के दराने ४०,५०० रुपये व्याज मिळाले असते.

---
नव्वदच्या दशकात होते सर्वाधिक व्याजदर
कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर मोठा आधार असणाऱ्या पीएफ खात्याचे व्याजदर ९० च्या दशकात सर्वोत्तम होते. त्यानंतर मात्र त्यात घसरण होत गेली. गेल्या सात वर्षांपासून ते ८.५० टक्के किंवा त्याहून कमी आहे. १९८४ मध्ये प्रथमच तो १० टक्क्यांच्या वर गेला होता. त्यानंतर १९८९ ते १९९९ च्या दरम्यान व्याजदर चढेच राहिले होते. एक काळ तर असा होता, की व्याजदर तब्बल १२ टक्के होता. १९९९ पासून मात्र व्याज दर कधीही १० टक्क्यांच्या आसपास आले नाहीत. २००१ पासून ते ९.५० टक्क्यांच्या खालीच राहिले आहेत. मार्च २०२० मध्ये व्याजदर २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून ८.५ टक्के या सात वर्षांच्या निचांकी पातळीवर आणला होता. २०१६-१७ मध्ये व्याजदर ८.६५ टक्के आणि २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के होता. २०१५-१६ मध्ये तो ८.८ टक्क्यांहून किंचित जास्त होता; तर २०१३-१४ तसेच २०१४-१५ मध्ये व्याजदर ८.७५ टक्के होता. २०१२-१३ मध्ये तो ८.५ टक्क्यांपेक्षा जास्त होता; तर २०११-१२ मध्ये व्याजदर ८.२५ टक्के होता.

१९९० ते २०२३ पर्यंतचे व्याजदर (टक्क्यांत)
१९९०-९९- १२
२०००-२००१- ११
२००१-२००५- ९.५०
२००६-१०- ८.५०
२०११-१५- ८.२५ ते ८.७५
२०१५-२०- ८.८ ते ८.५०
२०२१-२२- ८.१०
२०२२-२३- ८.१५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com