
मंडळ अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
मुरबाड, ता. २८ (बातमीदार) ः मुरबाड तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी लालचंद कांखरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २८) रंगेहाथ पकडले. जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची संगणकीय नोंद घेण्यासाठी या मंडळ अधिकाऱ्याला ९ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.
लालचंद कांखरे हा मुरबाड तहसीलमधील न्याहाडी सज्जातील मंडळ अधिकारी आहे. मुरबाडमध्ये लाच घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे होतच नाहीत, अशी तक्रार लोक अनेक दिवसांपासून करत होते; परंतु कोणीही याबद्दल तक्रार करण्याची हिंमत दाखवत नव्हते. अखेर एका व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार व्यक्तीकडे मंडळ अधिकारी कांखरे याने जमिनीच्या सातबारा उताऱ्याची संगणकीय नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपये मागितले होते; पण तडजोडीअंती ही रक्कम ९ हजार इतकी ठरली. मंगळवारी कांखरे याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.