बंद कारखान्यांमुळे रोजगार घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद कारखान्यांमुळे रोजगार घटले
बंद कारखान्यांमुळे रोजगार घटले

बंद कारखान्यांमुळे रोजगार घटले

sakal_logo
By

वाडा, ता. २८ (बातमीदार) ः वाडा तालुक्यातील अनेक कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाने सुरू ठेवण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कामगारांसह राजकीय कार्यकर्ते करीत आहेत, तसेच उद्योजकांना सोयी-सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी जिजाऊ संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वाडा तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी सरकारने २२-२३ वर्षापूवी ‘डी प्लस झोन’ योजना जारी केली होती. या योजनेत कारखानदारांना अनेक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसवले; मात्र आता एकेक कारखाना बंद होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून विजेच्या दरात अचानक वाढ करण्यात आल्याने लोखंडाचे अनेक कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये बहुलका स्टील, वैष्णव इडस्ट्रीज, तोरणा इस्पात, अष्टविनायक स्टील, जय ज्योतावली रोलिंग मिल, प्रणाली कास्टिंग, प्लाझा कास्टिंग, वरुण रोलिंग मिल, चित्तपूर्णा रोलिंग मिल, महालक्ष्मी रोलिंग मिल, कुडूस स्टील आदी कारखान्यांचा समावेश आहे. विजेच्या वाढीव दरामुळे उत्पादन खर्च वाढल्याचे कारण देत कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. तालुक्यातील घोणसई व डाकिवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘मोनाटोना’ ही टायर उत्पादन करणारी कंपनी होती. यात सुमारे एक हजारांच्या आसपास स्थानिक मराठी कामगार काम करीत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंदच आहे. त्यामुळे हजारो स्थानिक कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे.

---
३० ते ४० कंपन्या बंद
मेट येथील मेटाफिल्ड, घोणसई येथील कलरट्युन, एम. डी. प्रमोल्ड, कोने विजापूर येथील प्रतिभा इंडस्ट्रीज, बुधावली येथील आय. जी. स्टील व नेहरोली येथील टेक्सप्लास्ट, नारे मुसारणे येथील महाराष्ट्र पॉवर अशा शेकडो कंपन्या बंद झाल्या आहेत. तालुक्यात डी प्लस झोन झाल्यानंतर या भागात सुमारे एक हजारांच्या आसपास कारखाने होते. आताही येणे सुरूच आहे, पण यातील सुमारे ३५ ते ४० टक्के कारखाने बंद आहेत. कंपन्या बंद नेमक्या कशामुळे झाल्या याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.