
पुतणीचा बलात्कार करणाऱ्यास सश्रम कारावास
ठाणे, ता. २८ (वार्ताहर) ः आपल्या सख्ख्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि ६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यामूर्ती डॉ. रचना तेहरा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरत न्यायमूर्तींना आरोपीला शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. वयाची १८ वर्षे होईपर्यंत ती वसतिगृहात राहत होती; पण त्यानंतर ती तिच्या चुलत्याकडे दिवा येथे राहायला गेली. काही दिवसांतच आरोपीने पुतणीशी शारीरिक जवळिक करायला सुरुवात केली. ऑक्टोबर २०१९ मध्ये आरोपीने पीडितेवर तीन वेळा जबरदस्तीने अत्याचार केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी दिली. सततच्या अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने ही हकीकत आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर तिने याची तक्रार पोलिसांकडे केली. सरकारी वकील ॲड. विनीत कुलकर्णी यांनी न्यायालयात पीडितेच्या वतीने युक्तिवाद केला. याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.