
गंजाडला आदिवासी वारली कलादालनाची प्रतीक्षा
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ३० : वारली आदिवासी चित्रकलेचा प्रचार जगभरात ज्यांनी केला, असे सुप्रसिद्ध चित्रकार जीवा सोमा म्हसे यांनी चित्रकलेला वाव मिळवा म्हणून पालघर जिल्ह्यात वारली कलादालन व्हावे अशी त्यांची मागणी होत होती. या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांच्याकडे याबाबतचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला होता; मात्र अद्यापही कलादालनाची प्रतीक्षा कायम आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या ठिकाणी अद्यापही संस्कृतीचे जतन केले जाते. याच भागातील गंजाड या एका छोट्या गावात राहणाऱ्या जीवा सोमा म्हसे या आदिवासी कलाकारास पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आणि जागतिक आदिवासी चित्रकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली. त्यांनी या भागातील वारली चित्रकलेला मोठी प्रसिद्धी मिळवून देत मानाचे स्थान मिळवून दिले.
कोणतेही शिक्षण न घेता भारतीय आदिमकलेचा जगभरात प्रसार करणे हा मुख्य हेतू जीवा सोमा म्हसे यांनी साध्य केला.
जीवा म्हसे यांनी जवळपास १० देशांत या कलेचा प्रसार केला. यात जपान, चीन, अमेरिका, रशिया, इंगल्ड, जर्मनी आदी देशांचा समावेश आहे. जपानच्या प्रसिद्ध मिथिला म्युझियममध्ये जागतिक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे लावली जातात. येथे म्हसे यांची चित्रेदेखील आहेत. त्यांना पद्मश्री, जीवन गौरव, समाजरत्न, तुलसी, कलाश्री असे १६ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ६५ वर्षे वारली कलेची सेवा करण्यात घालवली. जीवा सोमा म्हसे या जगविख्यात वारली चित्रकाराचे १५ मे २०१८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, पण त्यांच्या या कलेची आजही पुढील पिढी जपवणूक करीत आहे. त्यांच्यानंतर त्यांची मुले सदाशिव आणि बाळू म्हसे तसेच त्यांचे शिष्य राजेश वांगड व शांताराम गोरखना हा वारसा पुढे चालवत आहेत. या पिढीने तर साता समुद्रापार ही कला पोहोचवली. आदिवासी जमातीची ही वैशिष्ट्यपूर्ण कला, संस्कृती सर्व जगभर पोहचवण्याचे काम ज्या म्हसे यांनी केले, त्यांच्या नावे वारली कलादालन त्यांच्या मूळ गावी व्हावे, ही नागरिकांची मागणी आहे.
------------
चित्रकलेची वैशिष्ट्ये
वारली चित्रकलेत मुख्यतः आदिवसी चालीरीती, परंपरा, सण, नृत्य, जन्मापासून मृत्यूपर्यंत अशा विविध विषयांचे चित्ररेखाटन केले जात असे. यासाठी तांबड्या रंगाच्या गेरूने रंगवलेल्या, सारवलेल्या भिंती, कागद आदीवर निरनिराळ्या आकारातील विविध प्राणी, पक्षी, माणसे, देखावे, सण, समारंभ असे प्रसंग कलात्मकतेने रेखाटलेले असतात. यामुळे मनमोहक आणि निसर्गाशी जणूकाही संवाद साधत आहे, असा भास होतो.
.....
वारली कलादालन व्हावे ही माझ्या वडिलांची इच्छा होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत कलादालन उभारण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. त्यासाठी निधीही देणार होते, परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतात दिसत नाही. नेट (जाळे) मासेमारी, खोंगाड (तारपा) वाजवणे, आदिवासींच्या असलेल्या देवतांचे अप्रतिम चित्र, विविध प्रकारचे चौक, तसेच जन्म ते मृत्यूचा प्रवास यासाठी ही चित्रकला प्रसिद्ध आहेत. शासनाने जगप्रसिद्ध आदिवासी चित्रकाराचे स्मारक आणि कलादालनाच्या निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून जगातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांची कला पाहता येईल.
- बाळू म्हसे, वारली चित्रकार, तथा जीवा म्हसे यांचे पुत्र
----------------
आदिवासी वारली चित्रकाराची कला सगळ्या जगाला समजावून घेण्यासाठी कलादालन असावे. आम्ही आमच्या परीने ही कला जगभरात पोहोचवण्याचे काम करीत आहोत. या कलेमध्ये आम्ही विविधता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी पारंपरिक रंग, गेरू, शेण अशा पदार्थांचा वापर करत आहोत.
- राजेश चैत्या वांगड, आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार, गंजाड