
कुत्रे निर्बिजकरणासाठी २५ लाखांची तरतूद
पालघर, ता. २९ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेने प्रथमच पर्यटनस्थळावरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे व निर्बीजीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद केली आहे. पालघर जिल्ह्यात श्वानदंशाच्या अनेक घटना घडत असतात. माहीम येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तेरा नागरिकांना चावा घेतला होता; पण पालघरमध्ये प्रतिबंधक लस नसल्याने या सर्वांना मुंबईला लस घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी जिल्हा परिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे व निर्बीजीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे.
पालघर जिल्ह्यात शहरी भागात व पर्यटन क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी लोकांची मागणी होती. ग्रामपंचायत पातळीवर भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आर्थिक तरतूद नव्हती, मात्र जिल्हा परिषदेने २०२३ -२४ च्या अंदाजपत्रकात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्प, विंचू, व श्वानदंश प्रतिबंध लस पुरवण्यासाठी ही २५ लाखांची तरतूद आता जिल्हा परिषदेने केले आहे.
...
सर्वसामान्यांना दिलासा
आतापर्यंत बऱ्याचशा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा आरोग्य केंद्रात कुत्र्यांच्या लशींचा तुटवडा जाणवत होता. माहीम येथील १३ जणांना कुत्रा चावल्यानंतर त्यांना इमिनोग्लोब्युलिन प्रतिबंधक लस घेण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले होते. या लशीच्या दहा मात्रा उपलब्ध असताना जिल्हा आरोग्य विभाग तसेच शल्य चिकित्सक विभागांतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात समन्वय नसल्याने रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागले. मात्र आता जिल्हा परिषदेने अंदाजपत्रकात या लशींसाठी तरतूद केल्याने लोकांनी याचे स्वागत केले आहे.