
मंत्रालयाबाहेर विषप्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईत मंत्रालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोनपैकी एका महिलेचा जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. सोमवारी (ता. २७) मंत्रालयाबाहेर गादेकर आणि संगीता डावरे (नवी मुंबई) या दोन महिलांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
शीतल गादेकर आणि संगीता डावरे (नवी मुंबई) या दोन महिला चेहऱ्याला मास्क लावून टॅक्सीतून सोमवारी मंत्रालयासमोर आल्या होत्या. गादेकर यांच्या पतीच्या निधनानंतर पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती; तर संगीता डावरे यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल आहेत. त्यांच्या पतीचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. याप्रकरणात संबंधित डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.
दोन्ही महिलांनी मंत्रालयासमोरील परिसरात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले; परंतु काही प्रमाणात विष शरीरात भिनल्याने त्यांना तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २८) शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला.
या दोन्हीही महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्या, तरी त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. या प्रकरणात पोलिस कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत.