डिसेंबर अखेरीस शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण होणार

डिसेंबर अखेरीस शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण होणार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः डिसेंबर २०२३ वर्षाच्या अखेरीस मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प पूर्णत्वास येईल. त्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त १५ मिनिटांवर येणार आहे. हा प्रकल्प कायापालट करणारा प्रकल्प ठरेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ज्या राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे कामे वेगात सुरू असतात, त्यावर त्या राज्याची भरभराट असते. हे सांगताना शिंदे यांनी सध्या एमएमआर परीसरात सुरू असलेल्या विकासकामांची यादी सांंगितली. राज्याच्या विकासाचा गेमचेंजर ठरलेला समृद्धी महामार्ग याच वर्षी मुंबईपर्यंत पोहोचेल. त्यामुळे मुंबईकरांना काही तासांमध्ये नागपूर गाठता येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांना डी. वाय पाटील विद्यापीठाद्वारे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डी.लीट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शिंदे यांनी आगामी काळात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची प्रगती विषद केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात हिंदी भाषेतून करत आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. स्वप्नवत वाटणारी वाटचाल किती खडतर आणि संकटांनी भरलेली होती. हे आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिंदे यांनी भाषणात हिंदी आणि मराठीसह नेल्सन मंडेला यांनी दिलेले घोषवाक्यही इंग्रजीतून सांगितले. आत्तापर्यंत डी.वाय. पाटील या विद्यापीठातून प्रख्यात वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, क्रिकेपटू सुनील गावस्कर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर ब्रायन लारा, इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती, खेळाडू लियांडर पेस, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ अशा अनेक लोकांना डि.लीट पदवी देऊन सन्मानित केले आहे. यात आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याचेही नावही सामील झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी राज्यपाल रमेश बैस, विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------
मी आधीच मोठे ऑपरेशन केला आहे
डॉ. डि. वाय. पाटील विद्यापीठाने डी.लिट ही पदवी प्रदान केल्यानंतर आता आपल्या नावापुढे डॉ. एकनाथ शिंदे अशी उपाधी लागणार आहे. हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी आपण या आधीच राज्यात फार मोठे ऑपरेशन केले आहे. असे ऑपरेशन अधीमधी करीत असतो, असे सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
----------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com