आरोग्‍यवर्धक शहाळ्यांना मुंबईकरांची पसंती

आरोग्‍यवर्धक शहाळ्यांना मुंबईकरांची पसंती

भारती बारस्कर ः सकाळ वृत्तसेवा
शिवडी, ता. २९ ः आरोग्यवर्धक शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला वारंवार डॉक्टर देत असतातच; मात्र उन्‍हाळ्यात या शहाळ्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्‍याचे दिसून येत आहे. मात्र मुंबईतील वाढलेल्‍या तापमानामुळे पोटाला थंडावा देणाऱ्या या शहाळ्याच्‍या मागणीत चारपट वाढ झाल्‍याचे विक्रेत्‍यांनी सांगितले आहे. विशेष करून बाजारपेठा, रुग्णालय, रेल्वे स्थानक, शाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याची विक्री होताना दिसत आहे.
उन्‍हाळ्यात अनेकांचे पाय थंडगार शीतपेये पिण्याकडे वळतात. या शीतपेयांनी तात्पुरता थंडावा मिळतो. त्याचप्रमाणे कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे किंवा फळांच्या रसाचा प्रभावदेखील काही काळच राहतो. मात्र निर्मळ, स्वच्छ कुठलीही भेसळ नसणारे पेय म्हणून मुंबईकर शहाळ्याच्या पाण्याला अधिक पसंती देत आहेत. हिरवेगार शहाळ्यातील मधुर पाणी केवळ तहानच भागवत नाहीत, तर उन्हाळ्याने ‘डिहायड्रेड’ झालेल्या शरीरात नवी ऊर्जा देते. निरनिराळी शीतपेये, विविध सरबतांच्या गर्दीतदेखील हे स्वच्छ व निर्मळ पेय आपले स्थान टिकवून आहे. शहाळ्यांचे पाणी आणि त्यातील कोवळे खोबरे खाल्ल्यास शरीराला चैतन्य मिळते. रुग्णालय परिसरासह बाजारपेठेत ठिकठिकाणी असलेल्या फळांच्या दुकानात व हातगाड्यांवरही शहाळ्याचे पाणी सहज उपलब्ध होते. सध्या वाढत्या तापमानामुळे शहाळ्याच्या मागणीत चारपट वाढ झाली असून ३० ते ४० रुपयांना मिळणारे शहाळे ५० ते ६० रुपयांनी विकले जात असल्‍याचे शहाळेविक्रेते दयाराम चौहान यांनी सांगितले.

आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या शहाळ्याचे पाणी प्यायल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जास्त औषधे खाण्याची गरज लागत नाही. उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक, दही, लिंबू पाणी याचे सेवन केल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात शरीराला फायदा होतो. त्यामुळे हेल्दी उन्हाळा बनवायचा असेल, तर नारळपाणी प्या.
- डॉ. महेश यादव, शिवडी

उन्हाळ्यात शहाळ्याची मागणी खूपच वाढते. त्यात रमजानचा पवित्र महिना चालू असल्याने मुस्लिम बांधवांचे उपवास सुरू आहेत; तसेच चैत्र नवरात्र उपवासदेखील सुरू आहेत. त्यामुळे फळांसह शहाळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या शहाळ्याचा भाव प्रतिशहाळे आकारानुसार १० ते २० रुपयांनी वाढला आहे.
- मनीष गुप्ता, शहाळेविक्रते

आरोग्यवर्धक नारळपाणी
नारळपाणी प्यायल्यामुळे तहान भागण्यासोबत त्या नारळातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला फायदादेखील होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देत असतात. तसेच हे प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरातील काही अंतर्गत त्रास नाहीसे होतात. सकाळी उपाशी पोटी नारळपाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते. नारळपाणी हे एक नॅचरल स्पोर्ट्स ड्रिंक आहे. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआउटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com