प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘आदिपुरुष’. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडून या टीझरला प्रचंड ट्रोल केले गेले. यातील स्पेशल इफेक्ट आणि रावणाच्या लूकमुळे हा चित्रपट बॉयकॉट करावा इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या. चित्रपटात प्रभू श्रीराम यांना चुकीच्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्‍यानंतर निर्माते आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. तसेच चित्रपटातील काही सीन्समध्ये बदल करण्यात आले. या चित्रपटाच्या छायाचित्रकारांनी मात्र ही गोष्ट खोटी असल्याचे सांगितले आहे. आता मात्र टी-सीरिज आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. ही पोस्ट शेअर करत हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात थ्रीडीमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली.

...................
‘मिसेस अंडरकव्हर’च्या टीझरची झलक
बॉलीवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आता १७ वर्षांपेक्षा जास्त काळ या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तिला तिची स्वतंत्र ओळख प्राप्त झाली. नुकतीच तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. राधिकाने तिच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये राधिका दिवसा एक गृहिणी आणि रात्री भूमिगत गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसत आहे. राधिका या चित्रपटात अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत आहे. टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल आतुरता निर्माण झाली आहे. राधिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. राधिकाच्या या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, ‘राधिका तुझा लूक उत्तम आहेच; पण यावेळी तो अधिक आकर्षक वाटत आहे.’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘मला वाटते की हा चित्रपट प्रचंड मजेदार असेल’.

...................

‘मैदान’चा टीझर भोलासोबतच येणार
अजय देवगणच्या सर्व चाहत्यांसाठी ३० मार्चला खास मेजवानी असणार आहे. त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचा टीझर ‘भोला’सोबतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांना तो मोठ्या पडद्यावर अनुभवता येईल. ‘मैदान’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये अजय देवगण सोबत प्रियमणी आणि गजराज राव देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंदरनाथ शर्मा यांनी केले आहे. तर निर्मिती बोनी कपूर, अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला यांची आहे. पटकथा आणि संवाद सायविन क्वाड्रास आणि रितेश शाह यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट २३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
..................

‘बोक्या सातबंडे’ लवकरच रंगभूमीवर
ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली ‘बोक्या सातबंडे'' कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती लवकरच नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर येणार आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला ‘बोक्या सातबंडे’ आता रंगभूमीवर अवतरणार आहे. दिलीप प्रभावळकरांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘बोक्या सातबंडे'' या पुस्तकावर आधारलेले ‘बोक्या सातबंडे’ हे व्यावसायिक नाटक लवकरच नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचे लेखन डॅा. नीलेश माने यांनी केले असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांचे दिग्दर्शन आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी, तर मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये दिसणार आहे. त्यांच्या जोडीला इतर कलाकारही आपल्या अभिनयाद्वारे रंग भरणार आहेत. नाटकाचे पोस्टर गौरव सर्जेराव यांनी डिझाइन केले आहे. गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निनाद म्हैसाळकर यांनी संगीत दिले आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी सेट बनवला असून, राहुल जोगळेकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. वेशभूषा महेश शेरला आणि रंगभूषा कमलेश बिचे यांचे आहे. संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे. ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर केला जाणार आहे.
..................

‘अवतार २’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर
‘अवतार २’ हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. २०२२ मध्ये जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार– द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली. काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता; पण तरी बॉक्स ऑफिसवर ‘अवतार २’ने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले असूनही तो ओटीटीवर प्रदर्शित झाला नसल्याने बरेच जण संभ्रमात आहेत. मात्र, आता लवकरच ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. युट्यूब आणि आयट्यून्स या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहेच. शिवाय आता प्राइम व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरही ‘अवतार २’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्राइम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना एक वेगळी रक्कम भरावी लागणार आहे. २० डॉलर्स म्हणजेच १६०० रुपये यासाठी मोजावे लागणार आहेत. ‘अवतार’चे आणखीन ३ भाग येणार असल्याची चर्चाही आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे. तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
...............

ऐश्वर्या-रोहित राधा-कृष्णाच्या वेशात
‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या भागात प्रेक्षकांना ते राधा आणि कृष्णाच्या वेषात दिसतील. ऐश्वर्या खरे म्हणाली, ‘राधा-कृष्णाच्या वेशात ऋषी आणि मी असलेला हा भाग पाहण्यास मी खूप अधीर झाले आहे. इतकी वर्षे प्रेक्षकांनी उदंड प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी आम्ही नवनवे मार्ग शोधत असतो. एक अभिनेत्री या नात्याने आम्हाला वेगवेगळी रूपे घेण्याची संधी मिळते आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो.’ रोहित सुचांती म्हणाला, ‘मला आठवतंय, लहानपणी दर जन्माष्टमीला आई माझी कृष्णासारखी वेषभूषा करत असे. आता इतक्या वर्षांनी या मालिकेत मला पुन्हा एकदा कृष्ण बनण्याची संधी मिळाली आहे. हातात बासरी आणि मोरपीस खोचलेल्या मुकुटात मी अगदी कृष्णासारखा दिसत होतो, हे पाहून मला खूपच आनंद झाला. या आगामी भागावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे, ते जाणून घेण्यास मी उत्सुक बनलो आहे’.
..................