
मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा कोरोना संकट
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. मात्र यातील केवळ एकच रुग्ण रुग्णालयात दाखल असून उर्वरित रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. असे असले तरी संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. २१ ते २४ मार्चदरम्यान दररोज एक रुग्ण आढळून येत होता; मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता अठरा झाली आहे. मात्र त्यापैकी केवळ एकच रुग्ण मुंबईतील रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे; तर उर्वरित सतरा रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे आयुक्त दिलीप ढोले यांनी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी नुकतीच विशेष बैठक बोलावली होती. बैठकीला आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने यांच्यासह महापालिकेचे डॉक्टर व भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयाचे डॉक्टरही उपस्थित होते.
दोन हात करण्यास रुग्णालये सज्ज
१ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोशी रुग्णालयात आधीपासून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयात दोनशे खाटा असून त्यातील शंभर खाटा कोरोनासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात अतिदक्षता विभागातील वीस खाटांचा समावेश आहे. जोशी रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचीदेखील तपासणी करण्यात आली आहे.
२ महापालिकेचे प्रमोद महाजन कोविड केंद्रही सुसज्ज करण्यात येत आहे. या केंद्रातही दोनशे खाटांची सुविधा आहे. त्यात अतिदक्षता विभागातील ५० खाटांचा समावेश आहे. जोशी रुग्णालय कोरोना रुग्णांनी भरले तर प्रमोद महाजन कोविड केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. त्या केंद्रातील ऑक्सिजन प्रकल्पाचीही तपासणी करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास तो सज्ज ठेवण्यात येणार आहे.
...
बूस्टरकडे दुर्लक्ष
कोरोना लसीकरणातही महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे; परंतु बूस्टर डोस घेण्यासाठी मात्र नागरिक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले, तर बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक गर्दी करतील, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करून लस न घेतलेल्या अठरा वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
....
९५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण