बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार

बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : उरणच्या कोप्रोली भागातील बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी घडली. यात महिलेच्या पायावर गोळी लागून त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बेलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सुप्रिया मंगेश पाटील (वय ३०) या उरणमधील कोप्रोली गावातील रहिवासी आहेत. त्यांचा पनवेल भागात रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यावसाय आहे. सुप्रिया पाटील या मंगळवारी (ता. २८) सायंकाळी पनवेल येथून आपला मावस भाऊ सर्वेश म्हात्रे याच्यासह निळ्या रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो कारने कोप्रोली येथे जात होत्या. त्यांची कार जुन्या पनवेल-उरण मार्गावरील बंबावीपाडा येथे आली असता ती अडवून हल्लेखोराने कारवर गोळीबार केला. या गोळीबारात सुप्रिया पाटील यांच्या डाव्या पायाला एक गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना तात्काळ बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सुप्रिया पाटील यांचा जबाब नोंदवून त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया पाटील यांच्यावर झालेला गोळीबार हा व्यावसायिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. गत १५ मार्च रोजी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांची नेरूळ सेक्टर-६ मध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच पनवेलमधील बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार केल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com