महापालिकेचे वाहनतळ धोरण कागदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचे वाहनतळ धोरण कागदावर
महापालिकेचे वाहनतळ धोरण कागदावर

महापालिकेचे वाहनतळ धोरण कागदावर

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) : एकीकडे वसई-विरार शहरात नव्या योजना येत आहेत, परंतु नागरिकांना प्रचंड डोकेदुखी ठरणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपायोजना करण्यात आली नाही. महापालिकेचे वाहनतळ धोरण केवळ कागदावर असून वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित नसल्याने आम्ही वाहने उभी करायची कुठे, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
वसई, नालासोपारा व विरार शहरातून हजारो नागरिक कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडतात. रेल्वेने प्रवास करण्याअगोदर वाहने स्टेशन परिसरात उभी केली जातात, परंतु वाहनतळाचा अभाव असल्याने अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यातच काही नागरिक हे बाजारहाट करण्यासाठी स्टेशन किंवा आजूबाजूच्या परिसरात येतात आणि रस्त्यालगत वाहन उभे करतात. त्यामुळे कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. महापालिका प्रशासनाने जर वाहनतळाची उभारणी केली, तर हा प्रश्न कार्यस्वरूपी निकाली निघू शकतो, परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. त्यामुळे पार्किंगची अपुरी व्यवस्था व होणारी कारवाई पाहता नागरिकांतून रोष व्यक्त होत असतो.
--------------------------
अनेकदा वादाचे प्रसंग
वाहतूक विभागाचे टोईंग वाहन कारवाईचा बडगा उगारून २०० रुपये टोईंग व ५०० रुपये दंडाची आकारणी करते. यासाठी शहरात ‘नो पार्किग’चे फलकही लावण्यात आले आहेत; मात्र वाहनतळ नाही, अशी परिस्थिती दिसून येते. यातच वाहनचालक व वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांत वाददेखील होतात.
....
नो पार्किंगमध्ये वाहने उभी असल्यास अशा वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. मार्गाला अडथळा निर्माण होत असल्याने कारवाई करण्यात येते.
- सागर इंगोले, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
------------------------
वसई-विरार शहरात वाहनतळ उभारण्यासाठी जागा निश्चित केल्या जातील. त्यानुसार शहरातील वाहनांना एकाच ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यासाठी लवकरच आखणी करण्यात येईल व पुढील कार्यवाही करू.
- राजेंद्र लाड, शहर अभियंता, महापालिका
----------------------
काही वेळाकरिता जरी वाहने रस्त्याच्या बाजूला उभी केली, तरी कारवाई केली जाते; मात्र पार्किंग व्यवस्थेबाबत कोणतीच योजना नाही. त्यामुळे आमची वाहने उभी करण्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय, उगाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
- प्रफुल्ल मोरे, नागरिक
-------------------------
कामानिमित्त जर स्टेशन परिसरात आलो, तर वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी व्यवस्था असावी. वसई-विरार महापालिकेने याबाबत लक्ष घातले तरच सुविधा मिळेल आणि आम्हाला वाहन उभे करण्यास अडचण येणार नाही.
- अत्री साळोखे, नागरिक