अपुऱ्या यंत्रणेमुळे मरेवर फुकटे प्रवासी वाढले!

अपुऱ्या यंत्रणेमुळे मरेवर फुकटे प्रवासी वाढले!

अपुऱ्या यंत्रणेमुळे मध्य रेल्वे ‘ओव्हरलोड’
वर्षभरात सर्वाधिक ४६.३२ लाख फुकट्या प्रवाशांचा भार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे. प्रवाशांची मोठी पसंती ही रेल्वेप्रवासालाच असते. त्यात मध्य रेल्वेचा आवाका सर्वाधिक असला, तरी अपुऱ्या यंत्रणेमुळे फुकट्या प्रवाशांचा मोठा फटका बसत आहे. मध्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४६.३२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांचा दंड वसूल करत इतिहास रचला आहे. मात्र, देशातील सर्वाधिक विनातिकीट प्रवासी मध्य रेल्वेवरच आढळल्याने त्याचे खापर अपुऱ्या यंत्रणेवर फोडले जात आहे. तिकीट तपासनिसांच्या कमतरतेमुळे आणि तिकीट खिडक्यांवरील गर्दीमुळे दिवसेंदिवस फुकटे प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे तिकीट तपासनिसांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे लोकल, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये मोहीम राबवली होती. तिकीट तपासणी पथकाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४६.३२ लाख प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करून ३०० कोटींहून अधिक दंड वसूल केला. दंडापोटी प्रथमच एवढा मोठा महसूल वसूल झाला. गेल्या आर्थिक वर्षातही मध्य रेल्वेने २१४.४१ कोटी कमावले होते. तोही विक्रमच होता.

फुकटे प्रवासी वाढण्याचे कारण
- तिकीट खिडक्यांवर रांग
- एटीव्हीएम मशीनवर गर्दी
- यूटीएस-एटीव्हीमप्रणालीबाबत अनभिज्ञता
- आरपीएफ आणि टीसींची संख्या कमी
- वेळेच्या बचतीसाठी विना तिकीट प्रवास करण्याची मानसिकता
- रेल्वेस्थानकांवतील चोर रस्ते
- अनेक स्थानकांत टीसींचे नसणे
- रात्री नऊनंतर रेल्वेस्थानकात आणि लोकलच्या डब्यात टीसी नसणे
- ‘फर्स्ट क्लास’मध्ये दुसऱ्या वर्गातील प्रवाशांची घुसखोरी

असा आकारला दंड
विभाग प्रकरणे महसूल
मुंबई १९.५७ लाख १०८.२५ कोटी रु.
पुणे ३.३६ लाख २४.२७ कोटी रु.
नागपूर ६.१६ लाख ३९.७० कोटी रु.
भुसावळ ९.०६ लाख ७०.०२ कोटी रु.
सोलापूर ५.२७ लाख ३३.३६ कोटी रु.

टीसींचीही विक्रमी कारवाई
- मध्य रेल्वेच्या वीस तिकीट तपासनिसांनी वैयक्तिकरीत्या एक कोटींहून अधिक रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तिकीट तपासनीस डी. कुमार यांनी २२,८४७ फुकट्यांवर कारवाई करत २ कोटी ११ लाख ७ हजार ८६५ रुपयांचा सर्वाधिक दंड वसूल केला.
- तिकीट तपासनीस एस. बी. गलांडे यांनी २२,३८४ फुकट्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ कोटी ९७ लाख ८७ हजार ४७० रुपयांचा दंड त्यांनी वसूल केला.
- तिकीट तपासनीस सुनील डी. नैनानी यांनी १८,१६५ फुकट्यांवर कारवाई करत १ कोटी ५९ लाख ९८ हजार १९० रुपये एवढा दंड गोळा केला.

टार्गेटचे टेंशन?
मध्य रेल्वेच्या काही तिकीट तपासनिसांनी नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले, की आम्हाला रेल्वेतर्फे वैयक्तिकरीत्या महिन्याचे आणि आठवड्याचे तोंडी टार्गेट दिले जाते. टार्गेट पूर्ण न केल्यास आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकण्यात येतो. टार्गेट पूर्ण करणाऱ्यासाठी तिकीट तपासनिसांना प्रचंड काम करावे लागते. रेल्वेची अशी चुकीची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. ती तत्काळ बंद करणे गरजेचे आहे. कारण टार्गेट पूर्ण करण्यासाठी टीसी छोट्या स्थानकांवर जात नाहीत.

रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे फुकटे प्रवासी वाढत आहे. अनेक रेल्वे तिकीट खिडक्यांवर आणि एटीव्हीएम मशीनवर प्रवाशांच्या रांगा असतात. साहजिकच प्रवासी वेळ वाचविण्यासाठी विनातिकीट प्रवास करतात. टीसींची संख्या आणि तिकीट सुविधा वाढवण्यासाठी आम्ही अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याची दखल अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. परिणामी दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आम्ही अनेकदा मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे; परंतु दर वेळी अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे केले जाते. रेल्वेमंत्र्यांनी टीसींची भरती करावी. सकाळी आणि संध्याकाळी सामान्य प्रवासी राजरोस फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतात. टीसी आणि आरपीएफ पोलिस नसल्याने त्यांचे फावते. रेल्वेने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- वंदना सोनावणे, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटना

मध्य रेल्वेच्या टीसींचे अभिनंदन; पण फक्त कारवाई करून चालणार नाही. फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेने उपयोजना केल्या पाहिजेत. प्रत्येक स्थानकावर तिकीट खिडक्यांची संख्या वाढवेने गरजेचे आहे. सोबतच एटीव्हीएम मशीन आणि जीटीबी ॲपसंदर्भात प्रवाशांमध्ये जागृती करायला हवी.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

विनातिकीट प्रवास करणे केवळ दंडनीय अपराधच नव्हे; तर एक सामाजिक गुन्हा आहे. प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकिटासह प्रवास करावा.
- पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com