नव्या जलजोडण्यांसाठी वाढती मागणी

नव्या जलजोडण्यांसाठी वाढती मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः सर्वांसाठी पाणी या मुंबई महापालिकेच्या पाणीधोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मागील चार महिन्यांत साडेसहा हजारांहून अधिक अर्ज महापालिकेकडे आले असून सुमारे सातशे कुटुंबीयांना नळजोडणी करून मिळाली आहे. पाणीधोरणानुसार नव्या जलजोडण्यांसाठी मागणी वाढत असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.
नव्या पाणीधोरणानुसार दहिसर येथील गणपत पाटील, मानखुर्द, महाराष्ट्रनगर येथील भीमनगर व मालाड पश्चिम येथील अंबूजवाडी या वसाहतीत जलजोडण्याचे काम झाले आहे. वर्सोव्यातील सिद्धार्थनगर येथे प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिन्यात जलजोडण्यांचे काम पूर्ण होईल. गणपत पाटील व अन्य झोपडपट्ट्यांतही जलजोडण्यांचे काम सुरू असल्याचे जलअभियंता विभागाने सांगितले.
मुंबई महापालिकेने १ मे २०२२ पासून पाणीधोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणानुसार मुंबईतील झोपडपट्ट्यांतून जलजोडण्यासाठी अर्ज केले जात आहेत. मुंबईभरातून शेकडो अर्ज पालिकेकडे आले आहेत. एक अर्ज ५ कुटुंबासाठी असे सुमारे सात हजारांवर कुटुंबांनी अर्ज केले आहेत. यातील दीडशेवर जलजोडण्या करून मिळाल्या आहेत. सर्वांसाठी पाणी मिळावे, यासाठी पाणी हक्क समितीकडून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. मोठ्या झोपडपट्ट्यांसाठी जलवाहिन्या टाकून मिळाव्यात, यासाठी झोपडीधारकांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत. यात काही झोपडपट्ट्यांसाठी जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. गणपत पाटीलनगर या झोपडपट्ट्यांतही जलजोडणी प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ७० जलजोडण्याचे काम झाले असून इतर काम सुरू आहे, अशी माहिती पाणी हक्क समितीचे सीताराम शेलार यांनी सांगितले.
...
पाणीमाफियांना चाप
अवैध झोपडपट्ट्या, रस्ते आणि पदपथांवरील झोपड्या, केंद्र सरकारच्या भूखंडावरील झोपडपट्ट्या यांना अधिकृत जलजोडण्या दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे या वर्गाला पाणी विकत घ्यावे लागत होते. दहा ते वीस लिटरच्या कॅनसाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. याचा फायदा झोपडीदादा आणि पाणीमाफियांनी उठवला. दुसरीकडे काही भागात निवासी इमारती, व्यावसायिक कार्यालयांमध्ये पाण्याची कमतरता आहे. या ठिकाणी टँकर वा अन्य मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. या अवैध पुरवठ्यासाठी पाणीचोरीचा अवलंब केला जातो. पाणीधोरणामुळे अशा पाणीमाफियांना चाप बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com