
धारावी झाेपडीधारकांना मदतीचा हात
धारावी, ता. ३० (बातमीदार) : धारावीतील राजीव गांधी नगर येथील झोपडीधारकांना महापालिकेच्या जी उत्तर विभागातर्फे राहत्या घराचे पुरावे सादर करण्याच्या नोटिसा नुकत्याच देण्यात आल्या आहेत; मात्र वस्तीतील अनेक जण निरक्षर, अर्धशिक्षित असल्याने त्यांना अडचणी येत होत्या. त्याचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटक त्यांची अडवणूक करून भरमसाट पैसे उकळत होते. याची दखल घेत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रहिवाशांना मदतीचा हात देत मोफत अर्ज भरून देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून धारावीतील मिठी नदीलगतच्या ९९० झोपडीधारकांना सात दिवसांच्या आत महापालिकेत घराची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नुकतीच पाठवण्यात आली आहे. मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत अनेक कामे प्रस्तावित असून पालिकेने हा प्रकल्प अत्यावश्यक नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.
दरम्यान, राजीव गांधी नगर येथील मारुती चाळ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष खुर्शीद शेख यांना काही रहिवाशांनी पुरावे सादर करण्याबाबत पैसे उकळले जात असल्याची तक्रार केली असता खुर्शीद शेख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पालिकेचा नमुना अर्ज मोफतत भरून त्यासोबत घराचे पुरावे जोडण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फेसुद्धा रहिवाशांना अर्ज भरून देण्यास सुरुवात केल्याचे पक्षाच्या साम्या कोरडे यांनी सांगितले. अर्ज भरून देण्यास मदतीचा हात मिळाल्याने स्थानिक रहिवासी इसरार शेख व अन्य रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सामाजिक बांधिलकीने मिळत असलेल्या मदतीने अर्ज भरून घेण्याचे आवाहन खुर्शीद शेख व साम्या कोरडे यांनी केले आहे.