रामजन्‍मोत्‍सवाचा उत्‍साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामजन्‍मोत्‍सवाचा उत्‍साह
रामजन्‍मोत्‍सवाचा उत्‍साह

रामजन्‍मोत्‍सवाचा उत्‍साह

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० ः रामनवमीनिमित्त मुंबईसह उपनगरांमध्‍ये विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळपासूनच प्रभू श्रीरामांच्‍या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. या वेळी विविध ठिकाणी होमहवन, आरती, भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते; तर काही भागात रक्‍तदान, आरोग्‍य शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवून रामजन्‍मोत्‍सव उत्‍साहात साजरा करण्यात आला.

वडाळ्यातील मंदिरात भक्‍तांचा मेळा
वडाळा (बातमीदार) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील वडाळा येथील प्रसिद्ध राम मंदिरात गुरुवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता रामजन्मोत्सव मोठ्या आनंदात व भक्तिभावाने साजरा केला. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने वडाळ्यातील राममंदिर फुलले होते. विशेष म्‍हणजे बुधवारपासूनच मंदिरात भजन, कीर्तन आणि धार्मिक विधी सुरू होते. संपूर्ण मंदिर परिसरात फुले आणि विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे; तर महामंगल आरती, देवता प्रार्थना, रथ रोहणा, रथ शोभायात्रा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर भाविकांसाठी महाप्रसाद भोजनदेखील ठेवण्यात आले होते. वडाळ्यातील प्रसिद्ध असलेल्या राममंदिरात गेल्या ५९ वर्षांपासून सातत्याने मोठ्या भक्तिभावाने हा रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. आठवडाभरापासून मंदिर परिसर सजवण्यास सुरुवात होते; तर जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशीपासून भाविक मंदिरात भजन-कीर्तनासाठी गर्दी करतात, असे उत्सव समिती अध्यक्ष उल्हास कामत यांनी सांगितले.

जोगेश्‍वरीत रामनामचा जयघोष
जोगेश्वरी (बातमीदार) ः जोगेश्‍वरी पूर्वेत रामनवमी मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजवलेल्या मंदिरांमध्ये श्रीरामाचा जयघोष सुरू होता. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले होते. जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप आणि मंदिराचा परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. जोगेश्‍वरी पूर्वेच्‍या कोकण नगर येथे आदल्‍या दिवशीच संध्‍याकाळी श्रीरामांच्या छबिन्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्‍या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बदोबस्‍तही ठेवण्‍यात आला होता.

मुलुंडमध्ये सांस्‍कृतिक कार्यक्रम
मुलुंड (बातमीदार) ः भाजप मध्यवर्ती कार्यालय मुलुंड पूर्व येथे श्री रामनवमी अत्यंत उत्साहात साजरी केली. याप्रसंगी अभय बापट यांचे गायन सादर करण्यात आले. मुलुंड मंडळ महामंत्री नंदकुमार वैती, वॉर्ड अध्यक्ष अस्मिता गोखले, विवेक शर्मा, अमोल धाईफुले आदी पदाधिकाऱ्यासह विविध संस्थांच्या महिलांनी या सोहळ्यामध्ये आपला विशेष सहभाग नोंदवला. तसेच संत श्री गजानन महाराज (शेगाव) उपासना परिवार, मुलुंड पूर्व यांच्यातर्फे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल येथेही श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी रामरक्षा या विषयावर प्रवचनकर्त्या ह. भ. प. भागवतकार शमिका कुलकर्णी यांनी प्रवचन दिले. रामरक्षा स्तोत्र पठण, श्रीराम जन्म पाळणा, आरती, दर्शन आणि प्रसादवाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्करोगग्रस्तांना अन्नदान
शिवडी (बातमीदार) ः श्री राम जन्मोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) परळ पूर्व येथील टाटा रुग्णालय येथे उपचार घेत असणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच गरजू रुग्णांना अन्नदान व फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे संचालक समीर परब, उल्हास पेडणेकर, राकेश पावसकर, दशरथ देवर, हनुमंता कोथामाले, रवींद्र आंधळे, उमेश हळदणकर, रिषभ नांगिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चेंबूरमध्ये मनसेतर्फे कार्यक्रम
चेंबूर (बातमीदार) ः चेंबूर येथील कॅम्प परिसरातील वाडवली गाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड शाखा क्रमांक १४६ तर्फे रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. भक्तांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. चेंबूर परिसरात मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे कुर्ला, टिळकनगर व चुनाभट्टी परिसरातही रामनवमी साजरी करण्यात आली. चेंबूर परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत असंख्य रामभक्तांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे परिसरात महाप्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे नेते नवीन आचार्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखा सचिव जयेंद्र पंडित, रामदास पवार, मनोज साळकर आदींनी केले होते.

आनंद बाबा आश्रमात होमहवन
घाटकोपर (बातमीदार) ः साकीनाका लक्ष्मी नारायण मंदिर मार्ग येथील आनंद बाबा आश्रमामध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त रामनवमीला होमहवन आणि महाभंडारा आयोजित करण्यात आला होता. या वेळी सर्व भाविक भक्तांनी गुरू समाधीची मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा केली. दरम्यान, कमला पंडित यांच्या मंत्रोपचारांमध्ये होमहवन कार्यक्रम झाला. यात महिलाशक्तीला मोठ्या संख्येने स्थान देण्यात आले होते. या वेळी आनंद बाबा आश्रमाचे भक्त आणि ट्रस्टी उमाकांत मिश्रा, श्यामादेवी मिश्रा, जयप्रकाश व्यास, संजय गिरी, अजित मिश्रा आदींसह अनेक भक्त उपस्थित होते. या वेळी शेकडो लोकांनी रामनवमी पूजा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

धारावीत शोभायात्रा
धारावी (बातमीदार) : रामनवमीनिमित्त धारावीत वज्रदल, हिंदू जनजागृती समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ९० फुटी रस्त्यावरील खांबदेव नगर परिसरातील संकल्पना गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील राम मंदिर येथून या शोभयात्रेस सुरुवात झाली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पुढे संत रोहिदास मार्ग, काळा किल्ला, मुकुंद नगर, धारावी कोळीवाडा, संत कक्कया मार्ग, दगडी बिल्डिंग, नवी चाळ, कामराज हायस्कूल, धारावी पोलिस ठाणे येथून फिरून वल्लभ इमारतीजवळ शोभायात्रेची सांगता करण्यात आली. भाविकांसाठी प्रसाद म्हणून जेवण ठेवण्यात आल्याचे संयोजक कृष्णा घोगीकर यांनी सांगितले.