जॉगिंगपार्कमध्ये अंधाराचे राज्य

जॉगिंगपार्कमध्ये अंधाराचे राज्य

घणसोली, ता. ३० (बातमीदार)ः पाम बीचलगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जॉगिंग पार्कमध्ये महिनाभरापासून अंधार पसरला आहे. त्यामुळे येथे प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्याने येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घणसोली नाल्याच्या कडेला अमृत अभियान हरितक्षेत्र विकासअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर जॉगिंग पार्क उभारले आहे. या ठिकाणी दिवसा अनेक नागरिक येतात; मात्र रात्री येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. या ठिकाणी सर्वत्र काळोख असून पायाखाली एखादी मांजर गेली तरीही चालणाऱ्याला ती दिसणार नाही. जॉगिंग पार्क असल्याने अनेक नागरिक या ठिकणी पूर्वी येत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून घणसोलीकरांनी या पार्ककडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर वाहने लावून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रेमी युगुलांचा खुलेआम वावर आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बनवलेले हे पार्क भलत्याच गोष्टींसाठी ओळखले जात आहे.
------------------------------
पाम बीच रोडवर येणाऱ्या नागरिकांना या पार्कमधून येताना चोरांची भीती वाटते. तसेच पार्कमध्ये कुत्र्यांचीदेखील मोठी संख्या असल्याने अंधारात हल्ला होण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे; तर स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनदेखील पाठपुरावा करूनही अंधाराची समस्या ‘जैसे थे’ आहे.
-------------------------------------
पाम बीचलागत असलेल्या जॉगिंग पार्कचा वापर नागरिकांसाठी होत आहे. या ठिकाणी अंधार असल्याने नागरिकांना यायलादेखील भीती वाटते. त्यात नशेखोर, प्रेमी युगुलांनी पार्कमधील अंधाराचा फायदा घेत ताबा घेतला आहे.
- मनीषा गोंडे, महिला
------------------------------
पाम बीचलगत असलेल्या जॉगिंग पार्कमधील लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यासाठी अनेकदा महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे; मात्र अद्यापही लाईट सुरू नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.
- सुरेश सकपाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, घणसोली, नवी मुंबई
------------------------------------
पाम बीचलगत असलेल्या जॉगिंग पार्कच्या बंद असलेल्या दिव्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल, तसे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
- संजीव पाटील, विद्युत अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com