कोरबा मिठागरमध्ये पाण्याअभावी नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरबा मिठागरमध्ये पाण्याअभावी नागरिक हैराण
कोरबा मिठागरमध्ये पाण्याअभावी नागरिक हैराण

कोरबा मिठागरमध्ये पाण्याअभावी नागरिक हैराण

sakal_logo
By

वडाळा, ता. ३० (बातमीदार) ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे मुलुंड येथे काम व त्यात ठाणे येथील जलबोगद्याच्या गळतीची दुरुस्ती यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे; मात्र वडाळा पूर्व येथील काही परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री ११ वाजल्यापासूनच पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने येथील नागरिक पालिकेविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. सध्‍या येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जादा पैसे मोजण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. स्‍वयंपाकासाठीदेखील पाणी नसल्याने महिला वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वडाळा पूर्व येथील कोरबा मिठागरमधील आदर्श रमाई नगर, काळेवाडी, शास्त्री नगर, मानुरवाडी, नानाभाईवाडी, लक्ष्मणवाडी, करीमवाडी आदी मिळून लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टीधारकांना गेल्या तीन दिवसांपासून म्हणजे २८ ते ३० मार्चदरम्यान पाणीपुरवठा न झाल्याने पाण्याअभावी येथील नागरिक हैराण झाले आहेत. पाण्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याने अनेक जण पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकत असून काही जण गणेश नगर, बीपीटी वसाहत या आजूबाजूच्या परिसरातून; तर काही लोक एक किलोमीटरचा प्रवास करून पाणी मिळवत आहेत.

पाणी विकत घेण्याची वेळ
अचानक झालेल्या शंभर टक्के पाणीकपातीमुळे जादा पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. एरवी ७० ते ८० रुपयांत मिळणारे पाणी १५० रुपये दराने येथील दुकानात विकण्यात येत आहे; तर तीन हजार लिटरचा एक टँकर दोन हजार रुपये दराने घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत असून महापालिकेविरोधात संताप व्यक्त करीत आहेत; तर पाणीकपात असतानाही आजूबाजूच्या विभागात पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे; मात्र कोरबा मिठागरमध्येच पाणीपुरवठा का खंडित करण्यात आला आहे, असा सवालदेखील येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जलवाहिनीचे मोठे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा काही प्रमाणात कपात केला आहे; मात्र पूर्णतःच पाणी कपात केल्याने विभागातील झोपडीधारकांना स्वयंपाक बनवण्यासाठीदेखील पाणी नाही. पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. किमान दोन तास तरी पालिकेने पाणी सोडायला हवे होते.
- भगवान कदम, रहिवासी

कोणतीही पूर्वसूचना न देता मंगळवारी (ता. २८) रात्री ११ वाजता अचानक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. आज तीन दिवस झाले. मुंबईसारख्या ठिकाणी तीन दिवस पाणीपुरवठा खंडित होणे आश्चर्यकारक आहे. आज तीन हजार लिटरचे प्रति दोन हजार रुपयांप्रमाणे पाच टँकर मागवण्यात आले. झोपडपट्टीधारकांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. पालिकेने तात्काळ पाणीव्यवस्था करणे गरजेचे आहे.
- संजय रणदिवे, मनसे शाखा अध्यक्ष, वडाळा पूर्व

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे १५ टक्के पाणीकपात आहे. या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल. सायंकाळी पाच ते सात व पहाटे चार ते नऊ या वेळेत दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येईल.
- गजानन बेल्हाळे, सहायक आयुक्त, एफ-उत्तर विभाग

जलवाहिनीच्या कामामुळे बुधवारी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी पूर्णतः रिकामी झालेल्या जलवाहिन्यांमध्ये पाणी जमा होण्यास वेळ लागतो. आज पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी अनेक परिसरातून पाणीपुरवठा न झाल्याच्या तक्रारी आहेत. तरी वडाळा कोरबा मिठागर परिसरातील पाणीपुरवठ्यासंबंधी आढावा घेऊन सायंकाळी पाणी सोडण्यासाठी सांगण्यात येईल.
- संदीप मेहर, जल अंभियता, एफ उत्तर विभाग