
पालघर नगरीत रामजन्म उत्सव
वसई, ता. ३० (बातमीदार) : रामनवमी निमित्त पालघर जिल्ह्यात भक्तिमय होते. मंदिरात रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. यावेळी ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राम जन्मोत्सवात रामनामाचा जयघोष करण्यात आला.
पालघर, वसई, विरार, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, बोईसर, सफाळे, डहाणू, वाडा, तलासरीसह अन्य भागात रामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी रामायण, रामाच्या जन्मोत्सवाच्या कथाकथनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. ‘जय राम श्री राम, जय जय राम’ असा जप देखील करण्यात आला. मंदिरात भजन, कीर्तन प्रवचन, महाभंडारा यासह धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पूर्ण पालघर जिल्ह्यातील भाविक राम नामात तल्लीन झाल्याचे दिसून आले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
वसई विरार शहरातही मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. सकाळपासून मंदिरात गर्दी झाली होती. भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात स्वयंसेवक तैनात होते. विरार, अर्नाळा, नालासोपारा, नायगाव परिसरातील मंदिरात रामनामाचा जप करण्यात आला. तसेच शोभायात्रा देखील काढण्यात आली. अर्नाळा येथे कोळीवाड्यात असलेल्या पुरातन रामाचे मंदिर हे मच्छीमार बांधवांसाठी श्रद्धास्थान आहे. याठिकाणी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली, तर नालासोपारा पश्चिम येथील जोशी परिवाराच्या राम मंदिरात डॉ. किशोरकुमार जोशी यांचे हरी कीर्तन व श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले होते. तसेच वसईच्या हनुमान व राम मंदिरात भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
......
खानिवडे रामरक्षा पठण
विरार (बातमीदार) : खानिवडे गावातील श्रीरामनवमी उत्सवास पहाटे पासून सुरुवात झाली. उत्सवाचे परंपरेने हे १५९ वे वर्ष आहे. सकाळी पूजा झाल्यावर रामरक्षा पाठ घेण्यात आला. त्याला मोठ्याप्रमाणात महिलांची उपस्थिती होती. येथील रामजन्म उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच झाली होती. नऊ दिवस दर रोज पहाटे मंदिरात रामरक्षा पठण केली जात होती.
......
पालघर तालुक्यात रामाचा जयघोष
पालघर (बातमीदार) : तालुक्यात पालघर, सातपाटी, मुरबे, नवापूर या गावांत रामनवमीनिमित्त तीन दिवस यात्रा भरणार आहे. यानिमित्त शुक्रवारी पालखीचे आयोजन केले आहे. तर पालघर येथे राम मंदिर ट्रस्ट तर्फे संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली. तसेच मंदिरात रामाचे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत
सातपाटी, मुरबे, नवापूर ही मच्छीमार बंदरे आहेत या ठिकाणी मच्छीमारांची मोठी वस्ती आहे. मच्छीमार हे मोठे राम भक्त आहेत. त्यामुळे रामनवमीच्या उत्सवासाठी गावाच्या बाहेर नोकरीनिमित्त या कामानिमित्त गेलेले चाकरमाने राम नवमीला मात्र आपल्या गावात येत असतात. गावातील मच्छीमार कुटुंबासह नवस फेडण्यासाठी म्हणून नाचत गाजत राम मंदिरात येत असतात. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच रामनवमी उत्सव निर्बंध मुक्त वातावरणात होत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भावी यात्रेचा पुरेपूर आनंद लुटणार आहेत. रामनवमीच्या दिवशी मंदिरात विश्वस्ताकडून पूजा केली दुसऱ्या दिवशी रामाची पालखी संपूर्ण गावभर फिरवली जाते. या काळात धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन अधिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे.