
पोषण ट्रॅकरमध्ये पालघर राज्यात दुसरा
पालघर, ता. ३० (बातमीदार) : केंद्रपुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ९७ टक्के लाभार्थ्यांची माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये यशस्वीरीत्या नोंदवण्यात आली. हे उल्लेखनीय काम केल्याबद्दल पालघर जिल्ह्याने राज्य स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त प्रशस्तिपत्र देऊन बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रवीण भावसार अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषदद्वारे पोषण पंधरवडाअंतर्गत विविध उपक्रम मागील वर्षी राबवण्यात आले होते. त्यादरम्यान पोषण ट्रॅकर अॅपमध्ये केलेल्या उपक्रमांची नोंदणी घेणे बंधनकारक होते. पालघर जिल्ह्यातून १ जानेवारीपासून दोन लाख १२ हजार लाभार्थ्यांपैकी दोन लाख पाच हजार जणांची नोंदणी करण्यात आली. आदिवासी जिल्हा असून अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असूनही पालघर जिल्ह्याने केलेल्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती तसेच सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत महिला व बालविकास विभागाचे कौतुक करण्यात आले. तसेच मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या प्रमुख मदतीनेच हे शक्य झाले आहे, असे मत प्रवीण भावसार यांनी व्यक्त केले.
......
सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांना त्यांच्या ग्रुपवर नेहमी मार्गदर्शक सूचना देऊन त्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्यात प्रवीण भावसार यांचे त्यांना सहकार्य लाभले. यामुळे पालघर जिल्हा हे धेय गाठू शकला. पुढच्या वेळी अव्वल येण्याचा नक्की प्रयत्न करू.
- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी