पाच वर्षीय मुलीचे अपहरण 
करणारा चार तासांत जेरबंद

पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणारा चार तासांत जेरबंद

नवीन पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : घराजवळ खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून फरारी झालेल्या आरोपीचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेत अपहृत मुलीची सुटका केली. प्रमोद महतो (वय ३१) या संशयित आरोपीने मुलीसोबत काही गैरकृत्य करण्यापूर्वीच तळोजा पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

अपहृत मुलीचे वय चार वर्षे ११ महिने असून ती तळोजा फेज-१ मध्ये आई-वडिलांसह राहते. बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती समवयस्क मैत्रिणींसह इमारतीबाहेर खेळत होती. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या प्रमोद महतो याने मुलीला फूस लावून स्कुटीवर बसवून पळवून नेले. मुलगी खेळता खेळता परिसरातून अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली; मात्र त्यांना मुलगी सापडली नाही. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास मुलीच्या पालकांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेची वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी गंभीर दखल घेत मुलीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना केले.

पोलिस पथकाने परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता प्रमोद महतो हा मुलीला स्कुटीवरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या स्कुटीवरील नंबरवरून, तसेच डॉग स्कॉडच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तळोजा येथील मेट्रो कारशेडजवळ आरोपीची स्कुटी व मुलगी सापडली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोपीचा शोध घेतला असता तोदेखील सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अपहरणाच्या गुन्ह्यात आज (ता. ३०) पहाटे अटक केली. पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

अपहरणामागचे कारण अस्पष्ट
मुलीच्या अपहरणामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रमोद हा मूळचा बिहार राज्यातील असून सध्या तो खारघरमध्ये राहतो. तसेच तो एका गॅरेजमध्ये कामाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com