
चोरट्यांच्या हल्ल्यात तिघेजण जखमी
वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळक्याने कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २९) पहाटे घडली. या हल्ल्यात तीन कामगार जखमी झाले आहेत. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार येथील मच्छा कंपाऊंड परिसरात काही कामगार राहतात. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खोलीबाहेर उभ्या असलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी, आम्ही चोर पकडले असून त्यांना तुम्ही ओळखता का, असा आवाज देत दरवाजा उघडण्यास सांगितले. मोहम्मद कादिर नदाफ मन्सुरी याने झोपेतून उठत दरवाजा उघडला असता बाहेर उभे असलेले दोघे जण खोलीत शिरले. कामगारांच्या खोलीत घुसून दमदाटी करण्यास सुरुवात केली व त्यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र कामगारांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या चोरट्यांनी त्यांना धमकावत धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अब्दुल मोहम्मद जैदीन मन्सुरी, मोहम्मद कादिर नदाफ मन्सुरी, रिजवान रमजान मन्सुरी असे तिघे जण जखमी झाले आहेत; तर चोरटे एकूण पाच मोबाईल घेऊन पसार झाले. या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या कामगारांनी निजामपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.