
महामार्गावर अपघातात जखमी गाईचा मृत्यू
कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज (ता. ३१) सकाळच्या वेळी एका भरधाव ट्रकने गाईला धडक दिल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी अथक मेहनत घेतली, मात्र जोरदार धडक बसल्याने गाईचा मृत्यू झाला. महामार्ग प्रशासनाने जखमी गाईला रस्त्यावरून बाजूला करून ते निघून गेले होते, मात्र जखमी गाय उन्हातान्हात बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कासा येथील नागरिकाने महामार्ग मृत्युंजय दूत हरबंस सिंग यांना कळवले. त्यांनी घटनास्थळी पोहचत जखमी गाईची पाहणी केली. चारोटी येथे राहणारे गंजाड पशुधन वैद्यकीय अधिकारी धनंजय धूम यांना माहिती दिल्यावर त्यांनी गाईवर उपचार केले. कासा येथील रामभक्त आशीष चव्हाण आणि अन्य तिघांच्या साह्याने त्या गाईला सावलीत घेतले. मात्र गंभीर जखमा झाल्याने काही वेळातच गाईने प्राण सोडला. त्यानंतर मृत गाईच्या दफनाची व्यवस्था करण्यात आली.