मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता

मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या हाणामारीने गुरुवारी (ता. ३०) रात्री मुंबईतील मालवणीत तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने या भागात आज तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, या प्रकरणात सुमारे ३०० हून अधिक अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करून आतापर्यंत २५ जणांना अटक केली आहे. त्यांना आज बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मालवणीत रामनवमीनिमित्त भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. यानंतर काहींनी दगडफेक केल्याचे समजते. त्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सध्या मालवणीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. ड्रोन आणि इतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तणाव निर्माण करणाऱ्या नागरिकांची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत याप्रकरणात २०० ते ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी घडलेल्या प्रकारामध्ये पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग मिळवले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार.
- अजयकुमार बन्सल, पोलिस उपायुक्त
-------------

मालवणी पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक
मालाड (बातमीदार) : मालवणी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मालवणीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिसांनी केले आहे, अशा शब्दांत आमदार अस्लम शेख यांनी मालवणी पोलिसांचे कौतुक केले आहे. दंगल माजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. सीसी टीव्ही फुटेज पडताळल्यानंतरच यामागचे सत्य समोर येईल. ज्यांनी कोणी चुकीचे काम केले असेल त्यांच्यावर कारवाई होईलच, असा विश्वासही शेख यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com