
रक्त १०० ते ३५० रुपयांनी महाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रुग्णांना आता रक्ताच्या दरवाढीचाही सामना करावा लागणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पाच वर्षांनंतर रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत. यामध्ये १०० ते ३५० रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. एकीकडे रक्ताचे दर वाढले असताना, दुसरीकडे सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्तावर दिले जाणारे अनुदानही काढून घेतले आहे. परिणामी रक्ताच्या पिशवीसाठी ११०० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी अनुदानाअंतर्गत ८५० रुपये शुल्क आकारले जात होते. सर्व काही महाग होत असल्याने रक्तपेढ्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून ही रक्तवाढ केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात ३३६ रक्तपेढ्या असून त्यापैकी मुंबईत ५८, पुण्यात ३५ आणि ठाण्यात २२ रक्तपेढ्या आहेत. राज्यात दररोज ४ ते ५ हजार युनिट रक्ताची गरज भासते. यापैकी केवळ मुंबईत ५०० ते एक हजार युनिट रक्त वापरले जाते. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी रक्तपेढ्यांमधून रक्त आणि रक्त घटकांच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकार सेवा शुल्क ठरवते. त्यातच नवीन सुधारित दराचा प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेने पाठवला होता. त्याला गेल्या महिन्यात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत. या रक्त आणि लाल पेशी म्हणजेच रक्तातील घटक महाग झाले आहेत.
सरकारी रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांना पूर्वीपासून रक्त मोफत दिले जाते. ही सूट यापुढेही कायम राहणार आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांत दाखल रुग्णांनी सरकारी रक्तपेढ्यांकडून रक्त खरेदी केल्यास त्यांना नवीन शुल्क म्हणजेच १,१०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यांना यापुढे अनुदानित दरात म्हणजेच ८५० रुपयांमध्ये रक्त मिळणार नाही.
...यांचे दर पूर्वीप्रमाणेच
रक्तातील घटक महागले असले तरी फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, क्रायोप्रेसिपिटेट आणि प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटच्या शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. यासोबतच प्लेटलेट ऍफेरेसिस प्रक्रिया शुल्काचे दर पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
सरकारी रक्तपेढीचे दर
रक्ताच्या पिशवीची किंमत - १,०५० रुपये
अनुदानाअंतर्गत पिशवी - ८५० रुपये
नवीन दरानुसार - १,१०० रुपये
खासगी रक्तपेढ्यांचे दर
एका पिशवीची किंमत- १,४५०
वाढलेले दर - १०० ते ३५२ रुपये
नवीन दरानुसार - १,५५० ते १८०० रुपये
साधारण दर तीन वर्षांनी रक्ताच्या किमती वाढतात; मात्र यंदा ५ वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. सर्व काही महाग होत आहे. याचा परिणाम रक्तपेढ्यांवर होत आहे. त्यामुळे दरात वाढ करण्यात आली आहे.
- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
गोंधळाची स्थिती
जागेची किंमत, कर्मचाऱ्यांचे वेतन, तपासणीचे किट, रक्ताच्या रिकाम्या पिशव्या या सर्व बाबी लक्षात घेऊन रक्ताचे दर निश्चित करण्यात आल्याचे मुंबई महापालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. पीपीपी अंतर्गत रक्तपेढ्यांना सरकारकडून जागा उपलब्ध करून दिली जाते. राष्ट्रीय एड्स नियंत्रण सोसायटी अनुदानित रक्तपेढ्यांमध्ये किट, रिकाम्या रक्ताच्या पिशव्या सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जातात. अशा रक्तपेढ्यांमध्ये कमी दरासाठी जीआर जारी करावा लागतो. पालिकेकडून परिपत्रक जारी होईपर्यंत नवीन दराची अंमलबजावणी करता येणार नसल्याने महापालिकेच्या रक्तपेढ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. पीपीपी अंतर्गत चालणाऱ्या काही महापालिका रक्तपेढ्यांमध्ये आधीच शुल्क वाढवले आहे.