मुंबईला सलग दुसऱ्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईला सलग दुसऱ्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’
मुंबईला सलग दुसऱ्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’

मुंबईला सलग दुसऱ्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मुंबईतील वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. ‘जागतिक वृक्षनगरी २०२२’ या यादीमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टांसाठी कार्यरत आहे; तर मागील सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाऊंडेशन या अमेरिकेतील संस्थेने आजवर तब्बल ३५ कोटींहून अधिक झाडे लावली आहेत. एवढेच नव्हे, तर सन २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाऊंडेशनचे लक्ष्य आहे. सन २०१९ मध्ये या दोन्ही संस्था एकत्र आल्या. त्यांनी जगभरात वृक्षसंवर्धन व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली. वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, यासाठी जगभरात कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत, याचादेखील या मोहिमेत शोध घेऊन त्यावर सतत संशोधन केले जाते. या निकषांवर उतरणाऱ्या शहरांची जागतिक वृक्षनगरी यादी घोषित करून त्यांना गौरवण्यात येते. अशा प्रकारे या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ पासून हा बहुमान सुरू करण्यात आला आहे.
...
२०२१ मध्ये प्रथम बहुमान
मुंबईला सन २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता सन २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. आर्बर डे फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरीनिशी या बहुमानाचे प्रमाणपत्र महापालिकेला सुपूर्द करण्यात आले आहे.
...
जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली!
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने मागील दोन वर्षांत विविध उपक्रम राबवून वृक्षसंवर्धन व नागरी वनीकरण यास चालना दिली आहे. या योगदानामुळे मुंबईला हा सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. भविष्यातही मुंबई महानगर अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि हिरवळीने बहरलेले राखता येईल, यासाठी अधिक जोमाने कामकाज करण्याची प्रेरणा यातून मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.