
खदाणीत पडून तरुणाचा मृत्यू
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) : वसई पूर्व वाघराळपाडा परिसरात डोंगर खोदून अनधिकृत खदाणी निर्माण झाल्या आहेत. अशाच एका खदाणीत पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता. ३१) दुपारी उघड झाली आहे. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील दुबे (वय २६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मुन्नी देवी आणि चार वर्षांच्या मुलासह वाघराळपाडा परिसरात राहत होता. त्याची पत्नी भाजीपाला विकत होती, तर तो मजुरीचे काम करत होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह एका खदाणीत आढळून आला. खदाणीच्या आजूबाजूला मोठमोठे डोंगर आहेत. याच डोंगरावर तो मद्यप्राशन करून गेला होता आणि त्याचा तोल जाऊन तो पडल्याने मृत्यू झाला असल्याचा संशय नागरिक आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असे सांगण्यात आले. मागील वर्षी याच ठिकाणी दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला होता.