सेतू सहकाराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेतू सहकाराचा
सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

sakal_logo
By

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

मृत सदस्याची थकबाकी कशी वसूल करावी?

प्रश्न - आमची सोसायटी ४० वर्षे जुनी आहे. संस्थेचा पुनर्विकास व्हावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. एक सभासद नामनिर्देशन न करता निधन पावले. त्यांच्या दोन मुली आहेत, त्या संस्थेची देणी देत नाहीत. त्यांची थकबाकी कशी वसूल करावी?
- श्रीधर भावे, श्रद्धा भावे, सहकार नगर, डोंबिवली.

उत्तर - इमारतीचा पुनर्विकास आणि थकबाकी वसुली हे दोन्ही वेगळे विषय असले, तरी ते दोन्ही विषय संस्था वेगळ्या पद्धतीने एकाच वेळी हाताळू शकते. सभासद नामनिर्देशन न करता निधन पावणे ही बाब सर्वसामान्य झाली आहे. त्याच्या मुलींपैकी ज्या मुली संस्थेमध्ये राहत आहेत किंवा जी मुलगी संस्थेच्या संपर्कात आहे, त्यांच्याकडून सभासदांच्या वारसांच्या तपशिलाची मागणी करावी. असे तपशील आल्यास त्या तपशिलानुसार सर्व वारसांना थकबाकी देण्याची नोटीस बजावावी. तसे तपशील न आल्यास ज्या दोन मुली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहीत आहेत त्यांना देणी देण्यासंबंधी नोटीस द्यावी व संस्थेच्या संपूर्ण थकबाकीची मागणी करावी. नोटीस देऊन थकबाकीची रक्कम न मिळाल्यास आपली संस्था ज्या विभागामध्ये आहे त्या विभागामधील सहकार निबंधक किंवा सहकार न्यायालयामध्ये त्या वारसांविरुद्ध थकबाकी वसुलीसाठी दावा दाखल करावा आणि संस्थेची सर्व थकबाकी व्याजासह वसूल करावी. याकामी संस्थेने योग्य वकिलांची मदत घेऊन काम पूर्ण करावे.
संस्थेच्या पुनर्विकासाबाबत सहकार खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या तत्त्वांना अनुसरून पुनर्विकास प्रक्रिया सुरू करावी. याकामीदेखील संस्थेला योग्य कायदेशीर सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कायदेसल्लागाराची नियुक्ती करावी. दोन्ही कामे एकाच वेळी करता येतील व त्यात कायद्याची कोणतीही अडचण येणार नाही.

प्रश्न - गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाचे सभासदत्व तसेच सदनिकेचा मालकी हक्क, हे बक्षीसपत्र नोटरी करून हस्तांतरित करता येईल का? असे केल्यास ते संस्थेवर कायद्याने बंधनकारक राहील का?
- उमेश ठाकूर, कल्याण

उत्तर - गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका व सभासदत्व यांचे हस्तांतरण करण्यासाठी जे अनेक मार्ग कायद्यांमध्ये आहेत, त्यात बक्षीसपत्र हादेखील मार्ग असून तो वैध कागदपत्रांमध्ये समाविष्ट आहे; परंतु संस्थेच्या उपविधी तसेच महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार सभासदत्व व सदनिका हस्तांतरणाचे जे सर्व मार्ग व कागदपत्रे दस्त यांचा समावेश आहे त्यामध्ये सर्व दस्त हे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. बक्षीसपत्र नोटरी करून एखादा सभासद जर त्याची सदनिका आणि सभासदत्व हस्तांतरण करू इच्छित असेल तर ते अयोग्य आहे. अशा नोटरी कागदपत्रांद्वारे सदनिका व सभासदत्व हस्तांतरण करणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर बंधनकारक नाही. संस्थेचे पदाधिकारी अशी विनंती नाकारू शकतात व असे हस्तांतरण नाकारणे हे योग्य व कायदेशीर आहे. नोटरी केलेले बक्षीसपत्र जरी सभासदाच्या कुटुंबामधील सदस्यांमधले असेल, तरीदेखील असे हस्तांतरण कायद्यास मान्य नाही.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ईमेलवर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in