
ग्रामीण भागात पापड करण्याची लगबग
वाडा, ता. १ (बातमीदार) : सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने खारवड्या, कुरडई, पापड, बटाटा वेफर्स, शेवया आदी उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची लगबग ग्रामीण भागातील महिलांमध्ये दिसत आहे. मध्यंतरी बदलत्या हवामानामुळे कधी थंडी; तर कधी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हे पदार्थ बनवण्यास अडचणी निर्माण होत होत्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून यासाठी पापड बनवण्याची लगबग ग्रामीण महिलांमध्ये दिसत आहे.
कृषिप्रधान देशात खारवडी, कुरडई, बटाटा वेफर्स, शेवया, पापड हे पदार्थ खास प्रक्रिया करून भारतीय पद्धतीनुसार करून सुकवून ते पुढे वर्षभर वेगवेगळ्या सणावारांना खाण्याची प्रथा आहे. खारवाडी, कुरडई हे कुरकुरीत करण्याची पद्धत ही कष्टदायी व मेहनतीची आहे. त्यासाठी दोन दिवस तांदूळ भिजत ठेवणे, ओले तांदूळ करून सुकवणे, नंतर ते दळून पीठ तयार केले जाते. तयार झालेले पीठ शिजवून घेऊन सकाळी सकाळीच पातळ पीठ अंगणात प्लास्टिक अंथरून त्यावर चमचाच्या सहायाने टाकून सुकवण्यात येतात. कुरडई साच्याच्या सहायाने टाकून सुकल्यानंतर वर्षभरासाठी साठवून ठेवण्यात येतात. अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या शेवया, उडीद पापड, ज्वारी, नांगली, तांदूळ, साबुदाणा यांचेही पापड तयार होतात.